अरुण परेरा, सुधा भारद्वाज, वेर्नोन गोन्साल्विस यांचा माओवाद्यांशी संबंध
राज्य सरकारची हायकोर्टात माहिती
मुंबई,(प्रतिनिधी) – पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा हिंसाचारा प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अरुण
परेरा, सुधा भारद्वाज आणि वेर्नोन गोन्साल्विस यांचा माओवाद्यांशी संबंध आहेत. त्याचे कॉल रेकॉर्डस, पत्रे आदी
पुरावे पोलिसांना तपासात मिळाले आहेत. असा युक्तीवाद राज्य सरकारने आज उच्च न्यायालयात केला आणि आरोपींच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला.
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी अरुण परेरा, सुधा भारद्वाज, वेर्नोन गोन्साल्विस यांच्या विरोधात
गुन्हे दाखल केले असून त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी आपली सुटका व्हावी यासाठी या तिघांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारच्यावतीने अरूणा कामत पै यांनी युक्तीवाद केला.
आरोपींना अटक केल्यानंतर तपासाची व्याप्ती वाढत असून तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. चौकशी बाकी आहे. आरोपी हे माओवाद्यांच्या “सीपीआय एम’ या बंदी घातलेल्या संघटनेशी संबंधित एका संघटनेचे कार्यकर्ते असल्याने या आरोपींना जामीन दिल्यास तपासावर त्याचा विपरीत परिणाम होईल. असा दावा केला.. आज सुनावणी अपूर्ण राहिल्याने न्यायालयाने पुढील सुनावणी 3 ऑक्टोबर पर्यंत तहकूब केली.