“पिक्चर’आधी “ट्रेलर’ व्हायरल
नारायणगाव – जुन्नर विधानसभा मतदारसंघाचा आघाडीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. तर कॉंग्रेस व राष्ट्रवादी हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत आहे. “दोस्तीत कुस्ती’ सुरू असल्याने आघाडीचा नेमका उमेदवार सत्यशील शेरकर की अतुल बेनके हे समजत नसल्याने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर शिवसेनेकडून आमदार शरद सोनवणे निश्चित मानले जात असून आशा बुचके यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
जुन्नर विधानसभा मतदारसंघ आघाडीत कॉंग्रेसला आला असून सत्यशील शेरकर हे उमेदवार असतील असे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते; मात्र या वृत्ताचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी खंडण करून अद्याप जुन्नरच्या जागेचा प्रश्न सुटला नसल्याचे सांगितले होते. 3 ऑक्टोबर रोजी मी उमेदवारी अर्ज दाखल करणार असे अतुल बेनके यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी जाहीर केल्याने सत्यशील शेरकर गट आक्रमक झाला होता. त्यामुळे मंगळवारी (दि. 24) शेरकर यांनी थेट पुणे गाठत जिल्हाध्यक्षांसमवेत चर्चा केली. चर्चेचे तपशील समजू शकले नसले तरी आमच्यात कोणतेच मतभेद नसल्याचा खुलासा अतुल बेनके यांनी बुधवारी (दि. 25) केला. त्यामुळे नेमकी ही जागा कॉंग्रेस की राष्ट्रवादी कॉंग्रेसला सुटली आहे, याबाबत निश्चित नसल्याने कार्यकर्त्यांची घालमेल सुरू झाली आहे. कारण, उमेदवारानुसार प्रचारतंत्र अवलंबवावे लागणार असले तरी “पिक्चर’च्या आधी “ट्रेलर’द्वारे प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न असतो. उमेदवार निश्चित नसल्याने दोघांचेही “ट्रेलर’ “व्हायरल’ होत आसल्याने आघाडीचा नेमका उमेदवार कोण? याबाबत मतदारही संभ्रमात पडले आहेत.
आशा बुचके यांच्यापुढे तीन मार्ग
अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असणाऱ्या आशा बुचके यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना-भाजप युती झाली नाही तर भाजपमधून उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून 2014 मध्ये उमेदवारी मिळून निवडून आलेले शरद सोनवणे हे शिवसेनेत गेले असल्याने शिवसेनेचा उमेदवार “निश्चित’ आहे. बुचकेंची भूमिका व आघाडीची भूमिका जोपर्यंत निश्चित होत नाही तोपर्यंत काही निष्ठावंत शिवसैनिक नक्की “कोणता झेंडा घेऊ हाती’ अशी संभ्रमावस्थेत आहेत.
…तर मी शेरकर यांचा प्रचारप्रमुख -अतुल बेनके
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थित जुन्नर विधानसभा निवडणुक नियोजन संदर्भात मंगळवारी (दि. 25) बैठक झाली. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जुन्नर तालुक्याचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अतुल बेनके यांनी मी शरद पवार यांचा निष्ठावंत कार्यकर्ता असून सत्यशील शेरकर व माझ्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत. सत्यशील शेरकर यांना आघाडीचे तिकीट मिळाले तर मी त्यांचा प्रचारप्रमुख म्हणून काम पाहणार व उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांच्याबरोबर जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षाचा निर्णय मान्य असेल -सत्यशील शेरकर
आपण निवडणुकीसंदर्भातील संपूर्ण रणनीती आखली असून प्रचाराची तयारी झाली असल्याचे सत्यशील शेरकर सांगितले. पक्षाकडून आदेश आल्यानंतर लगेच कामाला सुरुवात करणार असून ते जे निर्णय घेतील तो मला मान्य राहील. दुसरीकडे शेरकर गटातील समर्थकांनी जर सत्यशील शेरकर यांना उमेदवारी मिळाली नाही, तर त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढवावी असा आग्रह धरला आहे.