ट्रकची जीपला जोरदार धडक
मृत इंदापूर तालुक्यातील
ट्रक चालक फरार
कराड – मलकापूर (ता. कराड) गावच्या हद्दीत वीसचाकी ट्रकने राष्ट्रीय महामार्गाकडेला थांबलेल्या जीपला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात इंदापूर तालुक्यातील दोन जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात बुधवार, 25 रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातानंतर चालकाने ट्रकसह घटनास्थळावरून पलायन केले. मात्र, पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केल्याने कासेगाव येथे ट्रक आढळला असून चालकाने तिथून पळ काढला. शिवाजी हरिभाऊ मेहेर (वय 50, रा. सुरवड, ता. इंदापूर, जि. पुणे) असे अपघातात जागीच ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर प्रशांत पोपट मोरे (वय 40, रा. वडापूरी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर यशवंत तानाजी कोरटकर (रा. सुरवड, ता. इंदापूर, जि. पुणे) हे या अपघातात गंभीर जखमी झाले.
जीपचालक गोपाळ गणपत म्हेत्रे (रा. माळवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी अपघाताची खबर कराड शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोपाळ म्हेत्रे व यशवंत कोरटकर हे रेशीम कोश घेऊन गडहिंग्लज येथे निघाले होते. यावेळी जीपमध्ये त्यांच्यासोबत त्यांच्यासह प्रशांत मोरे व शिवाजी मेहेर हेही बरोबर होते. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून ते कोल्हापूर बाजूकडे गडहिंग्लजला जात असताना मलकापूर (ता. कराड) गावच्या हद्दीत रिलायन्स पेट्रोल पंपासमोर आल्यानंतर लघुशंकेसाठी रस्त्याच्याकडेला जीप उभी केली.
लघुशंका करून जीपमध्ये बसत असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या वीस चाकी ट्रकने जीपला जोरदार धडक दिली. या अपघातात शिवाजी मेहेर हे जागीच ठार झाले. तर प्रशांत मोरे व यशवंत कोरटकर हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालकाने ट्रकसह घटनास्थळावरून पलायन केले. मात्र नाकाबंदी वेळी जीपला धडक देऊन पळून चाललेला ट्रक पोलिसांच्या जाळ्यात सापडला. मात्र, समोर पोलिस असल्याचे लक्षात येताच चालकाने ट्रक बाजूला लावून तेथून पलायन केले. कराड पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून ट्रक चालकाचा पोलिस शोध घेत आहेत.