भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादी, वंचित रिंगणात; मनसेही कंबर कसणार
– संतोष गव्हाणे
पुणे – जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातून भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, वंचित बहुजन आघाडी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. यामध्ये भाजपाकडून विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे यांची उमेदवारी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेदरम्यान जाहीर केली आहे. त्यामुळे पाचर्णे यांची जोरदार तयारी आहे. युती झाली नाहीच तर शिवसेनेकडून वाघोलीतील जि.प.सदस्य ज्ञानेश्वर कटके भगवा घेत रिंगणात उतरतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून माजी आमदार अशोक पवार व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
राष्ट्रवादीकडून तिकीट मिळाले नाहीच तर प्रदीप कंद हे बंडखोरी करणार, अशीही चर्चा आहे. वंचितकडून संधी मिळाली तर रिंगणात उतरू, अशी भूमिका पं.स.सदस्य सर्जेराव वाघमारे यांनी ठेवली आहे. शिरूर-हवेलीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप अशी चुरस मानली जात असली तरी यामध्ये ऐनवेळी शिवसेना तसेच मनसे आणि वंचितचही भर पडण्याची चिन्हे आहेत. यामुळे या मतदार संघात राजकीयदृष्ट्या सर्वात तगड्या उमेदवारांत लढत होण्याची शक्यता आहे.
भाजपा-शिवसेनेची महायुती न झाल्यास मतदार संघातून शिवसेनेकडून पुणे जिल्हा शिवसेनेचे प्रमुख, वाघोली-आव्हाळवाडी गटाचे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांच्या उमेदवारीबाबत खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह माजी खासदार आढळराव पाटील यांनी दुजोरा दिला आहे.
राष्ट्रवादीकडून शरद पवार यांच्याकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद, माजी आमदार अशोक पवार यांच्यात रस्सीखेच आहे. पवार व कंद यांच्यात बऱ्याच दिवसांपासून गटा-तटाचे वाद असल्याने या दोघांमध्ये तिसरा उमेदवार येणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांनी लोकसभेच्या निवडणुकीवेळी खासदार अमोल कोल्हे यांच्यासाठी राष्ट्रवादीतून माघार घेतली होती. त्यामुळे त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाईल, असेही मानले जात आहे. वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांचे खंदे समर्थक कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष व हवेली तालुका पंचायत समितीचे सदस्य सर्जेराव वाघमारे यांच्या उमेदवारीलाही दुजोरा मिळत आहे. शिवसेनेचे असले तरी, पक्षाकडून संधी दिली गेल्यास नक्की रिंगणात उतरणार, अशी भूमिका वाघमारे यांनी ठेवली आहे. त्यांच्या सौभाग्यवती पाच वर्षे वाघोलीच्या सरंपच असल्याने तसेच कोरेगावभिमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही वाघमारे यांची बाजू भक्कम मानली जात असल्याने या माध्यमातून ते आव्हान निर्माण करू शकतील. मनसेची ताकदही या मतदार संघात मोठी असल्याने नेमका उमेदवार कोण, याबाबत अद्याप चाचपणी सुरू आहे.
शरद पवारच उमेदवार ठरवणार…
शिरूरमध्ये झालेल्या सभेत अजित पवार यांनी सांगितले होते की, शिरूर-हवेलीचा उमेदवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच ठरवणार आहेत. त्यानुसार पवार हे नवख्या उमेदवाराला संधी देणार काय, अशी चर्चा सुरू आहे. यावेळी हवेली तालुक्याला संधी मिळावी, याकरिता प्रदीप कंद यांचे नाव राष्ट्रवादीतून चर्चेत आहे. तसेच, गेल्या विधानसभेला पराभूत झालेले माजी आमदार अशोक पवार यांनाही पवार पुन्हा संधी देऊ शकतात. माजी आमदार अशोक पवार यांचा शिरूर-हवेलीत मजबूत गट असल्याने ते जोरदार प्रचार करीत आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारावेळी अशोक पवार मोठ्या प्रमाणात सर्कीय दिसले. यामुळे लोकसभेत राष्ट्रवादीला यश मिळू शकले, असा विश्वास पवार समर्थकांना असल्याने सध्या तरी त्यांची बाजू वरचढ मानली जात आहे.
आढळराव पाटील ताकद दाखविणार…
लोकसभा निवडणुकीत या मतदार संघात पराभव झाल्याने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना कोणत्याही परिस्थितीत या मतदार संघातून शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचा आहे. याकरिता भाजपकडे असलेला हा मतदार संघ फेररचना करून शिवसेनेकडे यावा याकरीताही त्यांनी प्रयत्न केले आहेत. जि.प.सदस्य ज्ञानेश्वर कटके यांच्या रूपात शिवसेनेकडे तगडा उमेदवार असल्याने या मतदार संघात शिवसेना विजयी होऊ शकते, असा विश्वास माजी खासदार आढळराव पाटील यांना आहे. विरोधकांना आपली ताकद दाखविण्याची पूर्ण तयारी आढळराव पाटील यांनी केली आहे.