पुणे: प्राईड प्रशालेने आंतर शालेय व्हॉलिबॉल स्पर्धेतील 14 वर्षाखालील मुलांच्या गटात विजेतेपद पटकाविले. त्यांनी अंतिम सामन्यात सिम्बायोसिस प्राथमिक प्रशालेचा 25-22, 25-22 असा पराभव केला.
पुणे महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद् यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अंतिम सामन्यात प्राईड प्रशालेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट स्मॅशिंग व बचावात्मक खेळ केला. त्यांच्या विजयात आविष्कार धुमाळ, अथर्व पवार व प्रणव मालुसरे यांनी मोठा वाटा उचलला. सिम्बायोसिसच्या अंशुल भांडवलकर, सौमित्र काकडे व रौनित शहा यांनी उल्लेखनीय लढत दिली. तृतीय क्रमांकासाठी झालेल्या लढतीत सिम्बायोसिस माध्यमिक प्रशालेने महानगरपालिका शाळा क्रमांक 83-बी संघाचा 25-10, 25-15 असा पराभव केला.
त्यावेळी त्यांच्याकडून वेद शिंदे, सोहम हगवणे व अद्वैत खेडकर चमकले. महानगरपालिका शाळा संघाकडून गणेश पाटोळे व रूपेश गायकवाड यांचे प्रयत्न अपुरे पडले. उपांत्य फेरीत सिम्बायोसिस प्राथमिक प्रशालेने सिम्बायोसिस माध्यमिक संघाला 25-20, 25-17 असे हरविले. प्राईड प्रशालेने महानगरपालिका शाळा संघाला 25-11, 25-12 असे नमविले.