सहकारी बॅंकांसह आर्थिक व्यवहाराच्या सर्वच माध्यमांचे परीक्षण
नवी दिल्ली – महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पैशाचा गैरवापर रोखण्यासाठी बॅंकेच्या व्यवहारांवर नजर ठेवली जाईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी म्हटले आहे. या दोन्ही राज्यांमध्ये 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे.
पैशाचा गैरवापर रोखण्यासाठी सहकारी बॅंकांसह आर्थिक व्यवहाराच्या सर्वच माध्यमांचे परीक्षण केले जाईल, असे अरोरा यांनी सांगितले.
महाराष्ट्रात माजी निरीक्षक मधु महाजन आणि पी. मुरली कुमार यांची विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती केली जाईल, असेही ते म्हणाले. महाजन मुंबई येथे तैनात असतील तर कुमार पुण्यात तैनात असतील, असे सूत्रांनी सांगितले.
आयकर विभागाच्या आर्थिक गुप्तचर विभागामार्फत बॅंकिंग वाहिन्यांवर देखरेख ठेवली जाईल. मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशाचा वापर होणार नाही याची खात्री करण्यासाठी मोठ्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करतील, असे सूत्रांनी सांगितले.
पारदर्शकता आणि निवडणूक खर्चावर देखरेख ठेवणे शक्य व्हावे यासाठी उमेदवारांना स्वतंत्र बॅंक खाते उघडणे आवश्यक असेल आणि त्याच खात्यातून त्यांचा निवडणूकीसाठीचा खर्च करावा लागेल.
दोन राज्यांच्या विमानतळांवर हवाई गुप्तहेर युनिट कार्यारत करण्यास तसेच गुप्त माहीती गोळा करण्यास प्राप्तीकर विभागाच्या तपास विभागाला सांगितले गेले आहे, असे निवडणूक आयोगाच्या निवेदनात म्हटले आहे,