दहशतवाद्यांच्या मदतीसाठी पाकतर्फे खटाटोप : काश्मीरच्या पोलीस महासंचालकांची माहिती
जम्मू: जम्मू आणि काश्मीर येथे दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी सिमेपलीकडून अंमलीपदार्थांच्या तस्करीत वाढ करण्यात आल्याची माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी बुधवारी माध्यमांना दिली असून पोलिसांमार्फत अंमलीपदार्थ पुरवणाऱ्या टोळीचा बिमोड करण्यासाठी विशेष प्रयोजन केले जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी अंमलीपदार्थाच्या तस्करीत वाढ झाली असून या वर्षी तस्करी करणाऱ्या आणि सेवन करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अटक करण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी सांगितले की, तस्करीतून आलेले पैसे मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांना आणि दहशतवादी कारवायांसाठी वापरण्यात येतात.
तसेच त्यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की, या वर्षी आतापर्यंत 340 तस्करांना अटक केली आहे. तर, 8 औषधांच्या दुकानांचे परवाने रद्द केले गेले असून आणखीन 12 जणांना सार्वजनिक सुरक्षा कायद्या अंतर्गत अटक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.