सातारा – पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. त्यातच खड्ड्यात गाड्या आपटल्याने अनेक गाड्यांचे टायर फुटल्याने वाहनधारकांच्यात संतापाची लाट उसळली आहे.
पुणे बेंगलोर महामार्गावर शेंद्रे ते आनेवाडी दरम्यान शेकडो खड्डे पडले आहेत. या महामार्गावरून ये जा करणाऱ्या शेकडो वाहनांना या खड्ड्यांचा सामना करावा लागत असल्याने वाहनधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महामार्गावरच वाढे फाटा हद्दीत रोड क्रॉस करण्याच्या ठिकाणी प्रचंड मोठे खड्डे पडल्याने एकाच दिवशी दहा गाड्यांचे टायर फुटल्याची घटना घडली आहे. याबाबत काही वाहनधारकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त केला.
शुक्रवारी मध्यरात्री वाढे फाटा येथे महामार्गावर सुमारे दहा गाड्या खड्ड्यांत आपटल्या. त्यांचे टायर फुटले तसेच मोठे नुकसानही झाले आहे. नुकसानीसोबतच वाहनधारकांचा वेळ वाया जात असल्याने हे खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी होत आहे. महामार्ग प्राधिकरणाने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास महामार्ग रोखण्याचा इशारा काही सामाजिक संघटनांनी दिला आहे.