संगमनेर – पुणे-नाशिक महामार्गावर वेल्हाळे शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि. 27) पहाटे हा अपघात घडला. भक्ष्याच्या शोधात महामार्गावर आल्याने वाहनाच्या धडकेने बिबट्यांचा मृत्यू होण्याची ही सातवी घटना आहे. यावरून रस्ते ओलांडताना बिबट्यांचे सर्वाधिक मृत्यू होत असल्याचे अधोरेखित झाले आहे.
बिबट्याचा वावर लोकवस्तीकडून आता महामार्गावर होत असल्याने त्यांच्या अपघातांच्या घटनांत वाढ होत आहे. पुणे-नाशिक महामार्गावर मागील काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर सातत्याने आढळून येतो. त्यामुळे हा महामार्ग बिबट्यांच्या मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. महामार्गावर प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना वेल्हाळे गावाच्या शिवारात मंगळवारी पहाटे बिबट्याचा मृतदेह आढळला. त्यांनी वनविभागाला त्याबाबत माहिती दिली. त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी आणि इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. हा नर जातीचा बिबट्या तीन वर्षांचा होता.
अपघातात गंभीर दुखापत झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वेल्हाळे नर्सरीत नेण्यात आले. महामार्गावर विविध ठिकाणी बिबट्याचे अपघाती मृत्यू होत असल्याने बिबट्याचे संवर्धनावर प्रश्नचिन्न निर्माण झाले आहे. वन संपत्तीचा ऱ्हास बिबट्यांच्या मृत्यूला कारण ठरल्याची शक्यता वनधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.