आज होणार बैठक : “डेडलाईन’ संपली तरीही पाणीपुरवठा विस्कळीत
पिंपरी – शहरातील पाणी टंचाईवरुन नुकत्याच झालेल्या महापालिका सभेत वादळी चर्चा झाली होती. सलग सहा तास चाललेल्या चर्चेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर आगपाखड केली होती. पाणीपुरवठ्याच्या बाबतीत आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. त्याला पाणी पुरवठा विभागाचा अयोग्य कारभार कारणीभूत असल्याचे मान्य करत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाणी वितरणाचे सूक्ष्म नियोजन शनिवारपर्यंत करण्याची “डेडलाईन’ पाणी पुरवठा विभागाला दिली होती.
मात्र, “डेडलाईन’ संपूनही पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही. मंगळवारी या प्रश्नावर प्रमुख पदाधिकारी व सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक होत असून त्याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. पवना धरण शंभर टक्के भरुनही पिंपरी-चिंचवडकरांना सध्या आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. त्यातच इतर दिवशी होणारा पाणी पुरवठा अनियमित व विस्कळीत स्वरुपाचा आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना शहरातील पाणी पुरवठ्याचे तीन-तेरा वाजले आहेत.
महापालिका इतिहासात प्रथमच पाणी पुरवठा विभागातील विस्कळीत कारभाराचे दर्शन नगरसेवकांसह नागरिकांना घडत आहे. महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणी पुरवठा विभागाविरोधात तक्रारींचा भडीमार केला. टॅंकर लॉबीसाठी पाणी टंचाई केली जात असल्याचा आरोपही केला होता. सलग सहा तास पाणी प्रश्नावर चर्चा झाली. सदस्यांच्या संतप्त भावना लक्षात घेता महापौर राहुल जाधव यांनी सभा तहकूब केली. त्यामुळे महासभेचे कामकाज होवू शकले नाही.
नगरसेवकांच्या तक्रारींवर खुलासा करताना आयुक्तहर्डीकर यांनी पाणी वितरणाचे सूक्ष्म नियोजन शनिवारपर्यंत (दि. 24) करण्याची “डेडलाईन’ पाणीपुरवठा विभागाला दिली होती. विस्कळीत पाणीपुरवठा नियमित होत नाही तोपर्यंत स्थापत्य, उद्यान आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांची सेवा पाणीपुरवठा विभागाकडे वर्ग करण्याचे निर्देश आयुक्तांनी प्रशासनाला दिले होते. मात्र, महासभेनंतर प्रशासन सुस्तावल्याचे चित्र आहे. स्थापत्य, उद्यान आणि बांधकाम विभागाचा अधिकारी वर्ग “जैसे थे’ आहेत.
शहरातील अनेक भागाला अपुऱ्या दाबाने व विस्कळीत स्वरुपाचा पाणी पुरवठा होत आहे. महासभेत जाहीर केल्याप्रमाणे महापौर राहुल जाधव यांनी उद्या पाणी पुरवठा संदर्भात बोलावली आहे. सर्वपक्षीय गटनेते, प्रभाग अध्यक्षांना बैठकीला बोलविण्यात आले आहे. चिंचवड येथील ऑटोक्लस्टर सभागृहात दुपारी बारा ते एक या वेळेत ही बैठक होणार आहे.
मागील 3-4 दिवसांत पाणी पुरवठा व्यवस्थेत बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. याबाबत मंगळवारी विशेष बैठक होत असून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुढील काही दिवसांत शहरवासियांना सुरळीत पाणी मिळेल.
– राहुल जाधव, महापौर.