पुणे – अग्रमानांकित वरूण कपूरने लिथुवेनियात आयोजित केलेल्या कुमारांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील मुलांचे विजेतेपद पटकाविले. त्याने अंतिम फेरीत स्लोवाकियाच्या आंद्रेज अन्तोस्कावर 21-17, 21-19 असा विजय मिळविला.
वरूणने अंतिम सामन्यात स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा सुरेख खेळ केला. द्वितीय मानांकित आंद्रेजने त्याला कौतुकास्पद झुंज दिली. मात्र निर्णायक क्षणी वरूणने सर्व्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण राखून विजयश्री संपादन केली. त्याने उपांत्य फेरीत इस्तोनियाच्या हान्स क्रिस्तेन पिलेव्हचा 21-14, 21-16 असा पराभव केला.
वरूणने सांगितले की, स्पर्धेत अव्वल मानांकन दिल्यानंतर त्या दर्जास साजेसा खेळ करण्याची माझ्यावर जबाबदारी होती. या स्पर्धेतील सहभागी झालेले सर्वच खेळाडू जिगरबाज अझल्यामुळे मला विजय मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. प्रत्येक लढतीमध्ये मला भरपूर शिकावयास मिळाले. उपांत्य व अंतिम सामन्यात माझा खेळ चांगला झाला. परदेशातील स्पर्धेत विजेतेपद मिळविल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. येथील स्पर्धेत पुन्हा सहभागी होण्याची माझी इच्छा आहे.