कोल्हापूर (प्रतिनिधी) – शिवसेना नेते व युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी करिता कोल्हापूर व सांगली दौऱ्यावर येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यावर कोसळलेल्या अस्मानी संकटातून पूरग्रस्त नागरिकांना सावरण्यासाठी शिवसेना बचाव कार्यापासून मदत कार्यात अग्रेसर असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसहाय्य योजनेतून मदतकार्याचा ओघ सुरु आहे.
या अनुषंगाने पाहणी करण्याकरिता आणि पूरग्रस्त नागरिकांना भेटून धीर देण्याकरिता शिवसेना नेते, युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे उद्या दि. 20 रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.
या दौऱ्यादरम्यान ते शहरातील बापट कॅम्प परिसरास भेट व पूरग्रस्तांना मदतीचे वाटप, तर सीपीआरमधील पूरग्रस्त रुग्णांच्या विभागास भेट देणार आहे, अशी माहिती राज्य नियोजन विभागाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.