पुणे – बालक तसेच महिलांवर अत्याचारामागे पूर्वीचे वाद, परिचय आणि विकृती ही तीन प्रमुख कारणे आहेत. बालकांच्या बहुतांश घटनांत ओळखीच्या व्यक्तींनी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्यामागे विकृती हे देखील प्रमुख कारण असल्याचा निष्कर्ष “एसएनडीटी’ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी काढला आहे. हे अत्याचार महाविद्यालये, शाळा, अर्धवट बांधकामे, भुयारी मार्ग, सार्वजनिक शौचालये अशा ठिकाणी घडल्याचे निदर्शनास आले आहे.
पुणे शहरात मागील काही वर्षांपासून महिला, बालकांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढीस लागले आहे. अशा घटनांमागची कारणे शोधण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. “एसएनडीटी’ महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. माधवी कुलकर्णी, डॉ. मधुरा जोशी, डॉ. मानसी राजहंस, डॉ. वासंती जोशी यांनी शहरातील 30 पोलीस ठाण्यांमधील उपलब्ध अत्याचार तसेच विनयभंग कलमांन्वये दाखल गुन्ह्यांच्या कागदपत्रांची पाहणी केली. पीडित बालक, त्याचे नातेवाईक तसेच पीडित महिलेने दिलेले जबाब वाचण्यात आले. घटनास्थळ, आरोपी, पोलिसांनी दाखल केलेली कलमे हे मुद्दे अभ्यासासाठी विचारात घेतले.
या अभ्यासातून काढलेला निष्कर्ष शुक्रवारी पोलीस आयुक्तालयात झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. कुलकर्णी, डॉ. जोशी, डॉ. राजहंस, डॉ. जोशी यांनी मांडला. यावेळी गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह उपस्थित होते.
डॉ. कुलकर्णी म्हणाल्या, 2016 मध्ये शहरातील विविध पोलीस ठाण्यात अशा प्रकारचे 498 गुन्हे दाखल झाले होते. 2017 मध्ये 508 आणि 2018 मध्ये 457 गुन्हे दाखल झाले होते. त्यांचा सखोल अभ्यास तसेच कारणमीमांसा करण्यासाठी मी तसेच माझ्या सहकार्यानी प्रत्येकी 112 दाखल गुन्ह्यांची कागदपत्रे पडताळली. यातून जुने वाद, परिचय आणि विकृती ही 3 प्रमुख कारणे आढळून आली. तसेच, समाजमाध्यमाचा वापर करून काही गुन्हे घडले होते. त्याचेही प्रमाण जाणून घेतले.
12 ते 15 वर्षे वयोगट केंद्रस्थानी मानून विश्लेषण करण्यात आले. शहरातील महाविद्यालये, शाळा, अर्धवट बांधकामे, भुयारी मार्ग परिसरात गस्त वाढविण्यात येणार आहे. वस्ती भागातील रहिवाशांनी अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी सजग राहणे गरजेचे आहे. गैरप्रकारांची माहिती पोलिसांना दिल्यास अशा प्रकाराच्या गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होईल.
– अशोक मोराळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे