पुणे – न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शहरातील गणेश मंडळाना ऑनलाइन परवाने देण्यासाठी अवघ्या आठवडाभराचा कालावधी शिल्लक असतानाच; परवाने देण्याची प्रक्रिया अतिशय धिम्यागतीने सुरू असल्याचे समोर आले आहे. 20 जुलैपासून ऑनलाइन परवान्यांसाठी सुमारे 792 अर्ज प्राप्त झाले असून त्यातील केवळ 302 मंडळांनाच सर्व परवाने देण्यात आलेले आहेत.
गणेश मंडळांना परवान्यांसाठी अर्ज करण्यास महापालिकेकडून 16 ऑगस्ट ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. या परवान्यांमध्ये वाहतूक पोलीस, महापालिका आणि शहर पोलीस असे तीन परवाने आहेत. या वर्षी परवाना घेण्यासाठी आता पर्यंत 792 मंडळानी अर्ज केले आहेत. त्यातील 556 मंडळांना वाहतूक पोलीस परवाना मिळाला असून महापालिकेने सुमारे 489 मंडळांना परवाना दिला आहे. तर पोलिसांकडून केवळ 302 परवाने देण्यात आलेले आहेत.
77 मंडळांनी केले दोनदा अर्ज
ऑनलाइन आलेल्या अर्जांमध्ये सुमारे 77 मंडळांनी दोन वेळा अर्ज केले आहेत. त्यामुळे काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असून या मंडळाना परवाने देताना यंत्रणांची अडचण होत असल्याचे समोर आले आहे. या मंडळांकडे काही कागदपत्रे अपूर्ण असल्याने त्यांनी दोनदा अर्ज केल्याची शक्यता आहे.