पुणे : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्रही मुसळधार पाऊस झाला असल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत सकाळी 11 वाजता 35 हजार 555 क्यूसेक ने पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागात पाणी घुसण्याची शक्यता आहे.
प्रामुख्याने नदीपत्राच्या कडेला असलेल्या सिंहगडरस्ता परिसरातील सोसायट्यांना या पुराचा धोका आहे. काल सोडण्यात आलेल्या पाण्याने या भागातील एक सोसायटी आधीच पाण्याखाली गेली असून इतर काही सोसायटीतही पाणी घुसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवणे, उत्तमनगर, सिंहगडरोड, खिलारे वस्ती, शिवाजीनगर, विश्रमाबाग, ओंकारेश्वर, जुनाबाजार, ढोले पाटील रोड या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पोलिसांच्या मदतीने याला भागात तातडीनं दक्षता इशारा देण्यात आला आहे.