एजबॅस्टन – भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात प्रेक्षकांमधून पिपाणी वाजवत भारतीय संघाला चिअर करणाऱ्या 87 वर्षीय चारुलता पटेल या यंदाच्या फॅन ऑफ द टुर्नामेंट ठरल्या आहेत.
चारुलता पटेल या कालपासून सोशल मेडियावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. कारण, या सामन्यात त्यांच्याच अवतीभवतीच कॅमेरा फिरत होता. त्यातच सामना संपल्यानंतर स्वतःहून टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा त्यांना जाऊन भेटले. दोघांनी त्यांभेट घेऊन आशीर्वाद देखील घेतले. बघता बघता त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सामना झाल्यानंतर चारूलता पटेल यांनी सांगितले की, मी आधी आफ्रिकेला राहात होते. बऱ्याच वर्षांपासून मी क्रिकेटचा आनंद घेते. आधी मी टीव्हीवर क्रिकेट बघायचे. कारण त्यावेळी मी एका संस्थेत कामाला होते. मात्र, आता मी रिटायर झाले आहे. यासाठी मैदानात जाऊन क्रिकेटचा आनंद घेते आहे.
त्यातच आनंद महिंद्रा यांनी चारूलता पटेल भारताचा सामना बघायला जाणार असतील तर त्यांच्या तिकीटांचा सर्व खर्च उचलण्याची तयारी दाखवली आहे. आनंद महिंद्रा हे क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. अनेकदा ते ट्विटवरुन क्रिकेटसंदर्भातील ट्विट करत असतात.