गडचिरोली – नक्षल चळवळीतील सर्वोच्च संघटना असलेल्या CPI (Maoist) संघटनेची एकमेव महिला सदस्य असलेल्या नर्मदाक्का आणि तिचा पती किरण कुमार यांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना आठवडाभरापूर्वीच गडचिरोली पोलिसांच्या स्वाधीन केले गेले असून सध्या त्यांची सविस्तर चौकशी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.
नर्मदाक्का आपल्या आजारी पतीसह हैदराबाद येथील रुग्णालयात असताना तेलंगणा पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्र पोलिसांनी तिला अटक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दोघांवर छत्तीसगडमधील आमदार भिमा मांडवी यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. ही हत्या 9 एप्रिल रोजी दंतवाडा जिल्ह्यात करण्यात आली होती.
दरम्यान, 2012 रोजी तिला दक्षिण गडचिरोलीच्या नक्षल कारवायांची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर तिच्या कार्यक्षेत्रात वाढ केली गेली. आदिवासी आणि जनजातीय क्षेत्र-दंडकारण्यातील महिलांना नक्षल चळवळीत दाखल करुन घेण्यात तिचा मोठा हातभार आहे.
पोलिसांविरोधात संघर्ष करण्यासाठी तिने अत्याधुनिक शस्त्रांसह सज्ज संघटनांतर्गत एका वेगळ्या पथकाची स्थापना देखील केली होती. तिच्यावर जाळपोळ, हत्या, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान अशा हिंसक प्रकरणात एकूण 53 गुन्हे दाखल आहेत. तीन वर्षांपूर्वी दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी. एन. साईबाबा याला नर्मदाक्का व अन्य काही जहाल नेत्यांना रसद पुरविण्याप्रकरणी अटक करण्यात आल्यामुळे ती पुन्हा प्रकाशझोतात आली होती.
महाराष्ट्र पोलिसांनी तिच्यावर 25 लाखाचे बक्षीस जाहीर केले होते. आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील मूळ निवासी असलेली नर्मदाक्का गेली 22 वर्षे भूमिगत राहून हिंसक नक्षली कारवाया करत होती. दरम्यान तिचा पती किरणकुमार चळवळीतील मोठे नाव असून तो दंडकारण्य स्पेशन झोन कमिटीचा सदस्य आहे. त्याच्यावर गडचिरोली जिल्ह्यातील नक्षली कारवायांची थेट जबाबदारी असल्याची माहिती पुढे आली आहे. किरणकुमारवर महाराष्ट्र सरकारचे 20 लाखाचे बक्षीस ठेवले होते.