पिंपरी – गेल्या दोन महिन्यांपासून महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रेबीज लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर रेबीज लसीचा डोस देणे गरजेचे असते. सध्या वायसीएममध्ये रेबीज लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांना बाहेरून रेबीजची खरेदी करावी लागत आहे. वैद्यकीय विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे रुग्णांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात शहर व जिल्ह्याभरातून रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, रुग्णालयातील अनेक गैससोईंचा सामना रुग्णांना करावा लागत आहे. वायसीएम रुग्णालयाचा ढिसाळ कारभार अनेकदा रुग्णांच्या जीवावर बेतल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. रुग्ण उपचारासाठी गेल्यानंतर अनेकदा रुग्णालयात औषधे उपलब्ध नसतात. यावेळी, रुग्णालयातील डॉक्टर औषधे बाहेरुन आणावयास सांगतात.
करोडो रुपयांची औषधे खरेदी केल्यानंतरही रुग्णांना त्रास दिला जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. विविध औषधांबरोबरच आता पालिकेच्या रुग्णालयात रेबीज लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. एका बाजूला पालिका भटक्या कुत्र्यांना आवाक्यात आणण्यात अयशस्वी ठरत आहे तर दुसऱ्या बाजूला रेबीजचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.