हायकोर्टाचा गुन्हा अन्वेषण विभागाला दणका
मुंबई (प्रतिनिधी) – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉ. हेमा आहुजा, भक्ती मेहर आणि अंकिता खंडेलवाल या तिन्ही डॉक्टरांची पोलीस कोठडीची गरज काय? असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित करून गुन्हे अन्वेषण विभागाला चांगलाच दणका दिला. या तिघाही आरोपींची चौकशीच करायची आहे तर न्यायालयीन कोठडीत करा. त्यांना आज गुरूवारी दुपारी दोन ते सहा आणि पुढील तीन दिवस सकाळी 9 ते 6 पर्यंत ताब्यात घ्या आणि चौकशी करा, असे आदेश गुन्हे अन्वेषण विभागाला दिले.
डॉ. पायल तडवीने नायर रुग्णालयाच्या वसहतीगृहात 22 मे रोजी गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर डॉ. हेमा आहुजा, भक्ती मेहर आणि अंकिता खंडेलवाल या तिघा डॉक्टरांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपाबरोबरच ऍट्रोसिटी आणि रॅगिंग प्रतिबंधक कायद्यांन्वये आगरीपाडा पोलीसांनी अटक केली. सुरूवातील सत्र न्यायालयाने या तिघींची तीन दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली. या तीन दिवसांत पोलीस चौकशी सुरू असतानाच प्रकरणाचे गांर्भीय आणि व्याप्ती पाहून तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला.
मात्र, या आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याने त्यांची चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडी द्यावी, अशी याचिका गुन्हे अन्वषण विभागाने उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवर आज न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी गुन्हे अन्वेषण विभागाच्यावतीने ऍड. राजा ठाकरे आणि ऍड. ज्योती लोहकरे यांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी करता आलेली नाही. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
आरोपीकडून केवळ आम्ही काही केले नाही, असे उत्तर दिले जात असल्याने जेल कोठडीत योग्य पद्धतीने चौकशी होणार नसल्याने पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती केली. यावेळी न्यायालयाने पोलीस कोठडीची गरज काय सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ताब्यात घेऊन चौकशी करून सायंकाळी भायखाळा कारगृहात सोडण्याचे निर्देश गुन्हे अन्वेषण विभागाला दिले.
वॉट्सऍप ग्रुपवर एकदा भगौडी म्हटलं
पायल तडवीवर आरोपींनी कधीही वर्णद्वेषी शेरेबाजी केली नाही. प्रसुतिगृहातील रुग्णांच्या ब्लडप्रेशरची चुकीची नोंद केल्याबद्दल प्रसंगी तिला दम दिला होता. मात्र ही चुक वारंवार तिच्याकडून होत होती. दरवेळी पायल, मी थकलेय, असे कारण द्यायची. म्हणून स्टाफच्या खासगी वॉट्सऍप ग्रुपवर तिला स्वत:ची जबाबदारी टाळ्ल्याबद्दल भगौडी असे म्हटल्याची माहिती आरोपींच्या वतीने ऍड. आबाद पोंडा यांनी न्यायालयाला दिली.