नवी दिल्ली – यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचारादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल लढाऊ विमान करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधताना ‘चौकीदार ही चोर है’ ही घोषणा बुलंद केली होती. राहुल गांधींच्या या नाऱ्याला प्रतिउत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या जेष्ठ नेत्यांनी आपल्या ट्विटर खात्यांवरील नावापूर्वी चौकीदार असा शब्द जोडला होता. दरम्यान, आज २०१९च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकांच्या निकालांनंतर लगेचच आपल्या ट्विटर खात्यावरील नावापूर्वीचा चौकीदार हा शब्द हटवला असून आपल्या या निर्णयाबाबत त्यांनी ट्विट करत माहिती देखील दिली आहे.
चौकीदार शब्द हटवण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी लिहितात, “आता ती वेळ आली आहे जेव्हा आपण चौकीदार या शब्दाला एक नव्या उंचीवर घेऊन जायला हवं. चौकीदार या शब्दाची जाण ठेवून आपण सर्वांनी आपल्या देशाच्या प्रगतीसाठी अविरत कष्ट करायचं आहे. चौकीदार हा शब्द माझ्या ट्विटर खात्यावरील नावातून हटवत असलो तरी तो नेहमीच माझ्या आत्म्याचा भाग राहील तुम्ही देखील असच करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो.”