राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर भाजपचा ताबा; संजय शिंदेंचा केला पराभव

माढा: माढा लोकसभा मतदार संघावर दबदबा असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यावर आता भाजपने ताबा मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विशेष लक्ष असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा पराभव झाला असून भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा विजय झाला आहे.

रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना ५,८२,७०५  तर राष्टवादीचे उमेदवार संजय शिंदे यांना ४,९७,७७८ मते मिळाली आहेत. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजयराव मोरे ५१२०५  मते मिळाली आहेत.

संजय शिंदे खरे तर भाजपचे नेते होते. वास्तविक पाहता गेल्या चार वर्षांपासून संजय शिंदे यांना माढ्यातून लोकसभेची उमेदवारी देण्याची तयारी भाजपने केली होती. पण संजय शिंदे राष्ट्रवादीत गेल्याने भाजपची पंचाईत झाली आणि उमेदवारी कुणाला द्यायची याचा घोळच सुरू झाला होता. रोज एका नव्या उमेदवाराचे नाव चर्चेत यायचे आणि हवेत विरूनही जायचे. त्यामुळे माढ्यातील पक्षाचे कार्यकर्ते अस्वस्थ होते. अखेर भाजपने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आणि आज ते विजयी झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.