मुंबई – मी राजकारणावर बोलण्याचा प्रयत्न करतो. पण मी अजून शिकत आहे, असे कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा म्हणाले. वढेरा यांनी पत्रकाराशी बोलताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
माझ्या पत्नीच्या कुटुंबाने देशासाठी आयुष्य दिले आहे. प्रियांका, राहुल यांच्या रक्तातच देशसेवा आहे. नरेंद्र मोदींकडून राजीव गांधींवर आरोप केले जात असल्यासंबंधी विचारले असता, राजकारणात मर्यादा पाळली पाहिजे असे त्यांनी सांगितले. जी व्यक्ती शहीद झाली आहे, त्याच्यासाठी बोलले पाहिजे असे मला वाटले म्हणून मी फेसबुकवर मत व्यक्त केले असेही त्यांनी सांगितले.
आपल्यावर होत असलेल्या आरोपांसंबंधी बोलताना, न्यायालयानेही व्यवस्थित चौकशी केल्यानंतर योग्य निर्णय दिला आहे. कायद्याचा आदर केला पाहिजे. मी कायद्यावर विश्वास ठेवतो. न्याय मागण्यासाठी मी न्यायालयात जाणार कारण तिथे न्याय मिळेल यावर माझा विश्वास आहे. माझ्यावर इतके आरोप करण्यात आले पण एकही गोष्ट सिद्ध झालेली नाही. मी कोणत्याही पदावर नाही. मी नात्यांचा चुकीचा वापर केलेला नाही. संपुआला बहुमत मिळाल्यानंतरही त्याचा फायदा उचलला नाही, असे वढेरा म्हणाले.