गुरूवारपर्यंत प्रतिसाद देण्याचा आदेश
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी येथून उमेदवारी अर्ज दाखल करणारे बीएसएफचे बडतर्फ जवान तेजबहादुर यादव यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने बाद केला आहे. त्या विषयी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची आज सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयाने आयोगाच्या वकिलाला यादव यांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यावरील आपला प्रतिसाद गुरूवारी सादर करण्याची सुचना केली आहे.
यादव यांनी सीमा दलातील जवानांना निकृष्ठ दर्जाचे अन्न दिले जात असल्याची तक्रार करणारा व्हीडीओ सन 2017 मध्ये सोशल मिडीयावर टाकला होता त्यामुळे त्यांना तेथून बडतर्फ करण्यात आले होते. आपली बडतर्फी भ्रष्टाचार किंवा बंडखोरीच्या कारणावरून करण्यात आलेली नाही असे ना हरकत सर्टिफिकेट त्यांनी सादर करावे अशी सुचना त्यांना आयोगाने केली होती. पण ते हे सर्टिफिकेट सादर करू शकले नाहीत म्हणून त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला होता. पण आयोगाचा हा निर्णय अन्यायकारक व भेदभाव करणारा आहे अशी यादव यांची तक्रार आहे. त्यांच्या वतीने प्रशांत भूषण हे कोर्टात केस लढवत आहेत.