कोलकाता: निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्यावरील बायोपिकलाही 19 मेपर्यंत स्थगिती दिली आहे. बाघिनी बंगाल टाइगरेस हा ममता यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 3 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र, निवडणूक आयोगाने त्याचे प्रमोशन आणि प्रदर्शनाला 19 मेपर्यंत स्थगिती दिली आहे.
सीपीआयच्या मागणीनंतर आयोगाने हा निर्णय घेतला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सिंगुर आंदोलन, लग्नाचा वाद, रायटर्स बिल्डिंग घेराव यासह ममता यांच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या घटना दाखवण्यात आल्या आहेत. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास मतदानावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता विरोधी पक्षांनी वर्तवली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला 19 मेपर्यंत स्थगिती दिली आहे. हा बायोपिक नसून महिलांच्या संघर्षांची कहाणी असल्याचा दावा चित्रपटाचे निर्माते नेहाल दत्त यांनी केला.