पुणे – आशय पालकरने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर डेक्कन जिमखाना इलेव्हन संघाने केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा 24 धावांनी पराभव करत येथे सुरू असलेल्या हेमंत पाटील प्रतिष्ठान यांच्या तर्फे व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट प्रिमियर लीग 2019 एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत विजयी सलामी दिली.
डेक्कन जिमखाना क्लब येथील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्यांदा खेळताना डेक्कन जिमखाना इलेव्हन संघाने 50 षटकांत 5 बाद 240 धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये आशय पालकरने 96 चेंडूत 8 चौकार व 1 षटकारांसह नाबाद 82 धावा, तर शुभमने 35 चेंडूत 7 चौकार व 1 षटकारांसह 57 धावा केल्या. सलामीचे फलंदाज तुषार श्रीवास्तव 25, धीरज फतंगरे 23, अभिषेक ताटे 17 बाद झाल्यावर आशय पालकर (82 धावा) व शुभम (57 धावा) या जोडीने सहाव्या गड्यासाठी 75 चेंडूत 100 धावांची भागीदारी करून संघाला भक्कम अशी धावसंख्या उभारून दिली.
या आव्हानाचा पाठलाग करताना केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा डाव 46.5 षटकांत सर्वबाद 216 धावांवर संपुष्टात आला. यात हर्षल काटे 42, जय पांडे 29, गणेश गायकवाड 26, निपुण गायकवाड 24, अथर्व काळे 21, सिद्धेश वरघंटी 23 यांची खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.