पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक निधीची ऑनलाइन पद्धतीने हाताळणी, तसेच सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता, गतिमानता, अचूकता आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने विकसित केलेल्या ऑनलाइन निवडणूक निधी व्यवस्थापन प्रणालीसंदर्भांत भारतीय स्टेट बँक आणि राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्यात करारनामा करण्यात आला.
प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांच्या उपस्थितीत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्यावतीने सचिव वसंत पाटील आणि भारतीय स्टेट बँकेच्यावतीने उपमहाव्यवस्थापक नवीन मिश्रा यांनी स्वाक्षरी केली.
जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी आणि तालुका अथवा प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी यांच्या बँक खात्यावर सहकारी संस्थांचा निवडणूक निधी जमा होणे, त्याचे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना वेळोवेळी आवश्यकतेनुसार वितरण होणे आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम राबविण्याकरीता निधीचा खर्च करणे, तसेच निवडणूक खर्च प्रस्ताव मान्यतेसाठी सादर होणे व मंजुरी प्राधिकारी यांनी त्याबाबत निर्णय घेणे या सर्व टप्प्यांचे केंद्रीभूत पद्धतीने सनियंत्रण करण्याच्या उद्देशाने सर्वसमावेशक अशी निवडणूक निधी व्यवस्थापन पोर्टल ही संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणावर राज्यातील २५० व त्यापेक्षा कमी सभासद असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळता अन्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि राज्यातील सर्व सहकारी संस्था, कृषि उत्पन्न बाजार समिती यांच्या निवडणुकांमध्ये मतदार याद्यांचे अधिक्षण, निर्देशन व नियंत्रण करणे व अशा सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यादृष्टीने प्राधिकरणाने ही प्रणाली विकसित केली आहे.
या प्रणालीमुळे निवडणूक निधीचे सर्व व्यवहार रोखीने करण्याऐवजी डिजिटल व्यवहार करण्याचे सर्व फायदे प्राप्त होणार असून सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता, गतिमानता, अचूकता आणण्यासाठी मदत होणार आहे. निवडणूक कार्यक्रमांची अंमलबजावणी परिणामकारकरित्या व प्रभावी व्हावी यासाठी राज्यातील जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी आणि तालुका अथवा प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कामकाजावर सनियंत्रण ठेवता येणार आहे.