पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – हिंजवडी येथील प्रतिष्ठित अलार्ड शिक्षण संस्थेला खासगी विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला आहे. पुण्यात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून अलार्ड विद्यापीठातर्फे प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. विद्यापीठात कुशल मनुष्यबळ व रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे. अलार्ड विद्यापीठातील प्रवेश त्यांच्या स्तरावरील प्रवेश परीक्षेद्वारे होणार आहेत.
अलार्ड विद्यापीठाचे संस्थापक डॉ. एल. आर. यादव यांनी आज पत्रकार परिषदेत विद्यापीठाची घोषणा केली आणि त्याची सविस्तर माहिती दिली. आम्ही अलार्ड आहोत, आम्ही वेगळे आहोत, ही संस्थेची ओळख आहे.
अलार्ड विद्यापीठ आता मनोवृत्ती, नेतृत्व, दक्षता, तत्परता आणि समर्पण या पाच स्तंभांवर आधारित शैक्षणिक उत्कृष्टतेला चालना देणार आहे. याठिकाणी ७० टक्के व्यावहारिक आणि ३० टक्के थेरॉटीकल शिक्षण मिळणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना १०० टक्के इंटर्नशिपची हमी मिळेल, असेही डाॅ. यादव यांनी या वेळी सांगितले.
अलार्ड विद्यापीठात प्रवेश परीक्षेत उच्च गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांनाच अलार्ड विद्यापीठ शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यात विद्यार्थ्यांना १००, ७५, ५० आणि २५ टक्के शिष्यवृत्ती मिळणार आहे. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी ऑनलाइन अलार्ड प्रवेश परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा बुद्धिमत्तेवर आधारीत असेल. स्वातंत्र्यसैनिक, शौर्यपदक विजेते व सैनिक, पत्रकार आणि अनाथ मुलांना शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याची घोषणा यादव यांनी आज येथे केली.