Ranji Trophy 2024 Semi-Final 2 ( #MUMvTN ) : – मुंबई येथील बांद्रा-कुर्ला काॅंप्लेक्समधील शरद पवार स्टेडियमवर आज सुरु झालेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पहिल्या दिवशी मुंबईचा वरचष्मा राहिला. मुंबईच्या आक्रमक गोलंदाजीपुढे तामिळनाडुच्या एकाही फलंदाजाला टिकून खेळता न आल्याने त्यांचा डाव १४६ धावांत संपुष्टात आला.
दिवस अखेरीस मुंबईने १७ षटकांत २ बाद ४५ धावा केल्या होत्या. मुंबईची सलामीची जोडी पृथ्वी शाॅ आणि भुपेन ललवाणी यांनी अवघ्या अनुक्रमे ५ आणि १५ धावा केल्या. तर मुशीर खान २४ धावांवर नाबाद आहे.
Stumps Day 1: Mumbai – 45/2 in 16.6 overs (Mohit Avasthi 1 off 16, Musheer Khan 24 off 53) #MUMvTN #RanjiTrophy #Elite #SF2
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 2, 2024
त्यापूर्वी नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतलेल्या तामिळनाडुचा डाव सुरुवातीपासून अडचणीत आला. अवघ्या ६४.१ षटकांत तामिळनाडुचा डाव १४६ धावांत संपुष्टात आला. एक बाद ० पासून सुरु झालेली तामिळनाडुची वाताहत रोखण्याचा प्रयत्न फक्त विजय शंकर आणि वाॅशिंग्टन सुंदर यांनी केला. या दोघांनी १९१ चेंडूंत केलेली ४८ धावांची भागिदारी हीच काय ती जमेची बाजू ठरली.
विजय शंकरने आपल्या ४४ धावांच्या खेळीत ८ वेळा चेंडू सेमापार धाडला तर वाॅशिंग्टन सुंदरने ४३ धावांच्या खेळीत ५ चौकार मारले. या दोघांनंतर मोहम्मद आणि अजित राम यांच्या अनुक्रमे १७ आणि १५ धावा उल्लेखनीय ठरल्या.
मुंबईकडून तुषार देशपांडेने २४ धावांत ३ तर शार्दूल ठाकूर, मुशीर खान आणि तनुस कोटीयान यांनी अनुक्रमे ४८, १८ आणि १० धावांमध्ये प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.