Ranji Trophy 2024 Semi-Final 1 ( #VIDvMP ) : – देशातील प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सर्वाधिक महत्त्वाच्या रणजी करंडक स्पर्धेच्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात येथील विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानावर विदर्भ विरुद्ध मध्य प्रदेश सामन्यात मध्य प्रदेशने पहिल्या दिवशी आपले वर्चस्व राखले. मध्य प्रदेशच्या आवेश खानच्या गोलंदाजीपुढे विदर्भचा पहिला डाव १७० धावांत संपुष्टात आला. त्यानंतर सावधपणे खेळत मध्य प्रदेशने २० षटकांत १ बाद ४७ धावा केल्या. मध्य प्रदेशचा सलामीवीर हिमांशु मंत्री २६ तर हर्ष गवळी १० धावांवर नाबाद आहेत. यश दुबेला उमेश यादवने ११ धावांवर बाद केले.
Stumps Day 1: Madhya Pradesh – 47/1 in 19.6 overs (Harsh Gawali 10 off 34, Himanshu Mantri 26 off 64) #VIDvMP #RanjiTrophy #Elite #SF1
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 2, 2024
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना विदर्भच्या फलंदाजांना स्थिरावू न देता मध्य प्रदेशच्या गोलंदाजांनी कमालीची कामगिरी केली. मध्य प्रदेशचा स्टार गोलंदाज आवेश खानच्या भेदक गोलंदाजीपुढे विदर्भाची काहीही मात्रा चालली नाही. एकूण ५६.४ षटके चाललेल्या विदर्भचा धावांचा वेग प्रतीषटक तीन होता. त्यांचा संपूर्ण संघ १७० धावांत गारद झाला.
यामध्ये मधल्या फळीतील फलंदाज करुण नायर याने १०५ चेंडूंत ९ चौकारांसह केलेल्या ६३ धावा सर्वाधिक ठरल्या,. त्या खालोखाल सलामीवीर अथर्व तायडेच्या ६३ चेंडूंतील ८ चौकारांसह ३९ धावा उल्लेखनीय ठरल्या. यश राठोड (१७) आणि ध्रुव शोरी व अमन मोखाडे (प्रत्येकी १३) तसेच आदित्य सरवटे (१२) यांना टिच्चून खेळणे अशक्य झाले.
#RanjiTrophy2024 #MUMvTN #SF2 : मुंबईच्या भेदक गोलंदाजीपुढे तामिळनाडु भुईसपाट…
मध्य प्रदेशकडून आवेश खानने १५ षटकांत ४९ धावा देताना चार खंदे मोहरे टिपले. तर कुलवंत खेजरोलिया आणि व्यंकटेश अय्यर यांनी अनुक्रमे ३८ आणि २८ धावा देताना प्रत्येकी दोन गडी बाद केले.