वॉशिंग्टन – गाझामध्ये अत्यावश्यक मदत पोचवण्यासाठी अमेरिकेने हवाई मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या भागांमध्ये मदत साहित्य प्रत्यक्ष पोचवणे शक्य होणार नाही, तेथे विमानातून मदतीची पॅकेट टाकण्यात येतील, असे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे.
ही एअरड्रॉपची मदत लवकरच सुरू होईल, असेही बायडेन यांनी म्हटले आहे. गाझामध्ये मदत पोचवण्यासाठी शक्य असेल त्या सर्व मार्गांचा अवलंब करण्यात येईल, अशी ग्वाही बायडेन यांनी दिली होती. त्यानुसार त्यांनी एअरड्रॉपची कल्पना पुढे केली आहे. ओव्हल हाऊस येथे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान एअरड्रॉपच्या पर्यायावर सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
प्रस्तावित युद्धविरामासाठी सुरू असलेल्या चर्चेबद्दलही बायडेन यांनी आपले निरीक्षण नोंदवले. रमदान येथे युद्धविराम लागू होणे अवघड आहे. तसेच हा युद्धविराम सोमवारपासून लागू होण्याची शक्यता पूर्वी वर्तवली जात होती. मात्र ते देखील अवघड आहे, असे ते म्हणाले.
जमिनीवरून गाझातील पॅलेस्टिनींपर्यंत जी मदत पोचवली जाते, ती हमासचे दहशतवादी नागरिकांमध्ये वितरीत होऊ देत नाहीत. तसेच मदत मिळवण्यासाठी पॅलेस्टिनींना खूप लांबपर्यंत प्रवास करावा लागतो, असे काही निरीक्षक गटांनी म्हटले असल्यामुळे एअरड्रॉप केल्यास गाझातील गरजूंपर्यंत थेट मदत पोचवता येऊ शकणार आहे.
हमास आणि इस्रायल दरम्यान युद्धविराम घडवून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. तसेच या संघर्षामध्ये जीवितहानी रोखण्यासाठीचेही प्रयत्न सुरू आहेत. हमासच्या ताब्यात असलेल्या इस्रायली ओलिसांच्या सुटकेसाठीचे प्रयत्न देखील सुरू असल्याचे बायडेन यांनी सांगितले.