ED Raid : बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हरियाणातील काँग्रेसचे आमदार सुरेंद्र पनवार आणि आयएनएलडीचे माजी आमदार दिलबाग सिंग यांच्या घरावर छापेमारी केल्याची माहिती समोर येत आहे. या छापेमारीत त्यांच्याकडे कोट्यवधींची अवैध संपत्ती सापडल्याचे सांगण्यात येत आहे. दिलबाग सिंगच्या यांच्या छापेमारी केलेल्या ठिकाणांवरून मोठ्या प्रमाणात अवैध वस्तूदेखील जप्त करण्यात आल्या आहेत.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलबाग सिंग यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात अवैध विदेशी बनावटीची शस्त्रे, 300 कार्टन्समधील अवैध सामान, 100 हून अधिक दारूच्या बाटल्या, 5 कोटी रुपये रोख आणि सुमारे चार ते पाच किलो सोने जप्त करण्यात आले आहे. दिलबाग सिंग याची लववून ठेवलेल्या मालमत्तेची मोठ्या प्रमाणात कागदपत्रेही सापडली असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, अंमलबजावणी संचालनालय (ED) हरियाणातील यमुनानगर जिल्ह्यातील कथित बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करत आहे. या संदर्भात राज्याचे काँग्रेस आमदार सुरेंद्र पनवार आणि इंडियन नॅशनल लोकदल (INLD)चे माजी आमदार दिलबाग सिंह यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले.
Directorate of Enforcement (ED) recovered illegal foreign-made arms, more than 100 liquor bottles & 5 crore cash and other materials have been recovered including several properties in India & abroad from Dilbag Singh Ex-MLA & his associate’s premises: ED pic.twitter.com/dctSya8JEJ
— ANI (@ANI) January 5, 2024
हे संपूर्ण प्रकरण अवैध खाणकामाशी संबंधित असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार, यमुनानगर, सोनीपत, मोहाली, फरीदाबाद, चंदीगड आणि कर्नालमध्ये दोन्ही नेत्यांचा आणि त्यांच्याशी संबंधित 20 ठिकाणांचा शोध घेण्यात आला.
यमुनानगर आणि आसपासच्या जिल्ह्यांतील कथित बेकायदेशीर खाणकामाच्या चौकशीसाठी हरियाणा पोलिसांनी अलीकडेच अनेक एफआयआर दाखल केल्यानंतर मनी लाँड्रिंगचे प्रकरण समोर आले आहे. अवैध खाणकामातून मोठ्या प्रमाणात सोने, चांदी आणि इतर धातूंची गुप्तपणे तस्करी होत असल्याचा आरोप आहे, याच आरोपाच्या धर्तीवर ईडीने छापामारी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.