लंडन : जगाच्या कानाकोपऱ्यातील सर्वच देशांमध्ये गुन्हेगारीची समस्या त्रासदायक होत चालली आहे. गुन्हेगारांच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी असल्याने हे गुन्हे रोखायचे कसे याचे आव्हान सर्वच पोलिसांना असते पण आता ब्रिटन सरकारने आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून एक अशी यंत्रणा तयार केली आहे. ज्यामुळे प्रत्यक्ष गुन्हा घडण्यापूर्वीच त्याची माहिती पोलिसांना मिळणार आहे.
2002 मध्ये स्टीव्हन स्पिलबर्ग याच्या मायनॉरिटी रिपोर्ट नावाच्या एका चित्रपटामध्ये या प्रकारची संकल्पना वापरण्यात आली होती. ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. ब्रिटन पोलिसांनी या प्रोजेक्टला सीडीएपी असे नाव दिले आहे. गेल्या तीन वर्षापासून या प्रोजेक्टवर प्रयोग सुरू असून त्याला आत्तापर्यंत यश मिळाले असे दिसत आहे. या संकल्पनेच्या येत्या काही कालावधीमध्ये आणखीन काही चाचण्या करण्यात येणार असून येत्या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये हे तंत्रज्ञान ब्रिटिश पोलीस प्रशासनामध्ये वापरण्यात येणार आहे.
या संकल्पनेवर जेव्हा प्रयोग सुरू होते तेव्हा लंडन आणि उपनगरातील वाहतुकीच्या माहितीच्या आधारे इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून पोलीस ग्रामीण भागातील अमलीद्रव्यचा व्यापार करणाऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचले होते. एका विशिष्ट कंपनीकडून ठराविक दिवशी मोटारी भाड्याने घेण्याच्या घटना आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने उघडकिस आणल्यानंतर पोलिसांना त्याबाबत शंका आली त्यानंतर त्यांनी अधिक तपास केला असताना यामध्ये अमली पदार्थाचा व्यापार गुंतल्याचे लक्षात आले.
या तंत्रज्ञानाचा योग्य प्रकारे वापर करण्यात आला तर संशयास्पद व्यवहार आणि संशयास्पद हालचाली यांची माहिती आधीच टिपण्यात यश येणार आहे आणि त्यामुळे भविष्यातील गुन्हेगारीवरही नियंत्रण ठेवता येणार आहे.