Sharad Pawar – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शरद पवार (Sharad Pawar) हेच आत्तापर्यंत निर्विवाद अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्या अध्यक्ष पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित करु शकत नाहीत, असा युक्तीवाद ऍड. देवदत्त कामत यांनी केला. तसेच हा अध्यक्ष पदाचा वाद नसून एका गटाला पक्षावर ताबा हवा आहे. त्यासाठी हा कट रचला गेला असल्याचा आरोपही त्यांनी अजित पवार गटावर केला.
राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे. दरम्यान शरद पवार गटाकडून युक्तिवाद सुरु करण्यात आला आहे. या सुनावणीवेळी शरद पवार गटाकडून अजित पवार गटाच्या शपथपत्रांचा मुद्दा पुन्हा अधोरेखित करण्यात आला.
ऍड. देवदत्त कामत म्हणाले, 2019 मध्ये जनतेने राष्ट्रवादी- कॉंग्रेस पक्षाच्या आघाडीला मतदान केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीला 54 जागा आणि कॉंग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
अजित पवार यांचा पक्ष विस्तारामध्ये कुठलाही हातभार नाही किंवा भूमिका देखील राहिली नाही. अजित पवार यांना फक्त पक्षावर ताबा हवा आहे. पक्षात किंवा संघटनेत त्यांच्याकडे कुठलीही जबाबदारी नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते राष्ट्रवादी संसदीय पक्षाचे नेते होते.
दिल्लीत पार पडलेल्या आठव्या अधिवेशनाच्या दरम्यान शरद पवार यांची अध्यक्ष म्हणुन निवड करताना प्रस्तावक म्हणून प्रफुल्ल पटेल होते. आता मात्र शरद पवार यांच्या अध्यक्ष पदाच्या निवडीला ते बेकायदेशीर संबोधत आहेत. ही सर्व प्रक्रिया निवडणूक अधिकारी म्हणून टी मास्टर यांनी पार पाडली.
1 सप्टेंबर रोजी शरद पवार यांची पक्ष अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय अधिवेशनात पितांबर मास्टर यांनी घोषणा केली होती. पितांबर मास्टर हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या निवडणुक कार्यक्रम समितीचे प्रमुख होते.
राष्ट्रीय अधिवेशनामध्ये जे पदाधिकारी होते त्यांच्या वतीने एकच नाव प्रस्तावित करण्यात आले होते. ते नाव शरद पवार यांचे होते. त्यावेळी पक्षात कुठलीही दुफळी नव्हती, असा युक्तीवाद कामत यांनी केला.
अजित पवारांची निवड आमदार कसे करू शकतात
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या घटनेनुसार सर्व निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली. त्याच आधारावर अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले. अजित पवार यांच्या वतीने जेव्हा दुसरा गट स्थापन करण्यात आला तेव्हा त्यांनी थेट आपले अध्यक्ष पदासाठी नाव निश्चित केले.
यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या घटनेनुसार कुठलीही कारवाई करण्यात आली नाही आणि अध्यक्षपदावर त्यांनी दावा करत स्वतःला अजित पवार यांनी अध्यक्ष म्हणून घोषित केले. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार यांची निवड आमदार करुच कसे शकतात.
अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करायची असल्यास त्यासाठी घटनेत राष्ट्रवादीच्या ज्या तरतुदी आहेत, त्या पूर्ण होणे गरजेचे आहे. परंतु त्या कुठेही पाळल्या गेल्याचे पाहायला मिळत नाही, असा युक्तीवादही कामत यांनी केला.