virat kohli : विराट कोहलीने (virat kohli) वनडे कारकिर्दीतील 50 वे शतक पूर्ण केले आहे. यासह त्याने सचिन तेंडुलकरचा (sachin tendulkar) विक्रम त्याच्यासमोरच मोडीत काढला. हा सामना पाहण्यासाठी सचिन स्वतः वानखेडेवर उपस्थित आहे. अखेर विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम त्याच्या नावे केलाय.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा (sachin tendulkar) विक्रम मोडून काढला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये विराटने 49 वे शतक झळकावून सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली होती. सचिनने 452 एकदिवसीय डावात 49 शतके झळकावली होती. त्याचबरोबर कोहलीने 279व्या डावात 50 शतके झळकावली आहेत.
मात्र, कोहलीच्या शतकादरम्यान त्याच्या मनगटावर एक खास प्रकारची काळ्या रंगाची पट्टी दिसली होती. सध्या सोशल मीडियावर याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात असल्याचं दिसत आहे. नेमकं विराट कोहलीच्या हातात काय होत? हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागली आहे.
अनेकांनी हे घड्याळ असल्याचा अंदाज लावला, पण हे घड्याळ नसून ‘फिटनेस बँड’ आहे. हा फिटनेस बँड इतर कोणत्याही फिटनेस बँड किंवा ट्रॅकरपेक्षा खूप वेगळा आहे. कोहलीच्या मनगटावर दिसणारा बँड ‘हूप’ (WHOOP) ब्रँडचा आहे, जो सध्या भारतात लॉन्च झालेला नाही.
बाजारात अनेक प्रकारची स्मार्ट घड्याळे आणि फिटनेस बँड्स उपलब्ध आहेत. पण हा वेगळ्या प्रकारचा बँड आहे, यात डिस्प्ले नाही आणि तो वेगळ्या पद्धतीने चार्जही होतो. त्याची वैशिष्ट्ये तुम्हाला आश्चर्यचकित करतील. हा बँड तुम्हाला विराटच्या मनगटावरच नाही तर इतर भारतीय क्रिकेटपटूंच्या मनगटावरही दिसतो.
WHOOP ची खासियत?
हा ब्रँड 2015 मध्ये सुरू झाला. विल अहमद हे त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक आहेत. कंपनीने 2015 मध्ये आपले पहिले उपकरण Whoop 1.0 लाँच केले. 2021 मध्ये कंपनीने त्याची 4.0 आवृत्ती लॉन्च केली. अलीकडेच कंपनीने OpenAI सोबत भागीदारी केली आहे. या अंतर्गत कंपनीने हूप कोच लॉन्च केला आहे.
यासोबतच हा फिटनेस बँड सबस्क्रिप्शन आधारित आहे, तो वापरण्यासाठी तुम्हाला मासिक सबस्क्रिप्शन फी भरावी लागेल. WHOOP 4.0 च्या मदतीने, तुम्ही हृदय गती बदलता, तापमान, श्वसन दर, रक्तातील ऑक्सिजन पातळी, खर्च केलेल्या कॅलरी आणि इतर अनेक गोष्टींचा मागोवा घेऊ शकता. त्याची किंमत 239 डॉलर आहे. मात्र, ते अद्याप भारतात उपलब्ध नाही. हे 24 तास घातले जाऊ शकते. त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या झोपेचा मागोवा घेऊ शकता.