World Cup 2023 South Africa vs Australia 2nd Semi-Final : एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत आज ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघाने बुधवारी न्यूझीलंडचा पराभव करून फायनलमध्ये धडक मारली असून आज जेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाशी होणार हे निश्चित होणार आहे.
ऑस्ट्रेलियानं गोलंदाजाच्या भेदक माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी अक्षरशा गुडघे टेकले. डेविड मिलरचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाच्या आक्रमणाचा सामना एकट्या डेविड मिलर याने केला. मिलरच्या झंझावती शतकी खेळीच्या बळावर आफ्रिकेनं 49.4 षटकात सर्वबाद 212 धावांपर्यंत मजल मारली आहे. आता ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरी गाठण्यासाठी 213 धावांची गरज आहे.आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने सर्वाधिक धावा केल्या. मिलरने 116 चेंडूत 8 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 101 धावा केल्या.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्याच षटकात संघाला पहिला धक्का बसला तो कर्णधार टेंबा बावुमाच्या रूपाने, जो खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर सहाव्या षटकात दबाव दूर करण्याच्या प्रयत्नात क्विंटन डी कॉक 14 चेंडूत 3 धावा काढून बाद झाला. त्यानंतर 11व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर एडन मार्कराम 10 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आणि 12व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रॅसी व्हॅन डर ड्युसेन 06 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार बावुमा आणि मार्कराम हे वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क तर डी कॉक आणि रासी वन डर डुसेन वेगवान गोलंदाज हेजलवुडचे बळी ठरले.
यानंतर डेव्हिड मिलर आणि हेनरिक क्लासेन यांनी मिळून आफ्रिकेच्या डावाची धुरा सांभाळली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 113 चेंडूत 95 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी 31 व्या षटकात ट्रॅव्हिस हेडने सेट झालेल्या क्लासेनला बाद करून संपुष्टात आणली. यानंतर षटकाच्या पुढच्याच चेंडूवर त्याने नवा फलंदाज मार्को यास्ने याला शून्यावरच पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर सातव्या विकेटसाठी डेव्हिड मिलरने गेराल्ड कोएत्झीसह 53 धावांची (76 चेंडू) भागीदारी केली आणि संघाला योग्य धावसंख्येपर्यंत नेण्यात योगदान दिले. दोघांची ही भागीदारी 44व्या षटकात कोएत्झीच्या विकेटने मोडली. पॅट कमिन्सने कोएत्झीला वैयक्तिक 19 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कर्णधार पॅट कमिन्सने 48व्या षटकात शतक झळकावणाऱ्या डेव्हिड मिलरला 101 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर बाद केले. त्यानंतर 50 व्या षटकात कॅगिसो रबाडा 10 धावांवर शेवटची विकेट म्हणून पॅट कमिन्सच्या जाळ्यात अडकला.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी केला कहर
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत मिचेल स्टार्क आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. यादरम्यान स्टार्कने 10 षटकांत 34 धावा आणि कमिन्सने 9.4 षटकांत 51 धावा दिल्या. याशिवाय जोश हेझलवूड आणि ट्रॅव्हिस हेड यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या.