पुणे – वाहन चालवताना चालकाला डुलकी लागल्याने अनेकदा मोठे अपघात होता. अशा अपघातामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यावरून इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला एकल युक्ती सुचली आणि त्याने चक्क एक चष्मा बनवला असून तो चष्मा चालकाला डुलकी लागल्यास अलर्ट देणार आहे. परिणामी अपघातांच्या संख्येत घट होऊ शकते.
आयुष घोलप असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो आंबेगाव तालुक्यातील चास येथील आहे. तो अवसरी खुर्द येथील न्यू ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकतो.
आयुषला लहानपणापासूनच विज्ञानाची आवड असून तो वर्गात हुशार व चाणाक्ष विद्यार्थी आहे. तो नेहमीच विविध प्रयोग करत असतो.
आता त्याने शाळेतील विज्ञान प्रकल्प विषयात रस्त्यावरील अपघात कमी होण्यासाठी मदत करणारा गॉगल विकसित केला आहे. हा गाॅगल चष्मा बनविण्यासाठी त्याने त्यामध्ये सेन्सर, बटन, गाॅगल, बॅटरी, चार्जर आदी साहित्याचा वापर केला आहे. केवळ अडीचशे (250 रुपये) रुपयांमध्ये त्याने हा सेन्सर असलेला गाॅगल तयार केला आहे. भविष्यात या गाॅगलवर तज्ज्ञांच्या माध्यमातून अभ्यास करून अशा प्रकारचा गाॅगल विकसित केल्यास महामार्गांवरील मोठे अपघात रोखण्यात निश्चित यश येईल.
हा चष्मा कसे काम करतो?
वाहन चालवत असताना चालकाला अनेकदा डुलकी लागते. ज्यावेळी वाहन चालकाचे डोळे बंद होतील त्यावेळी चष्म्यात बसवण्यात आलेल्या सेन्सर अॅक्टीव्ह होऊन एक आवाज येईल. त्याआवाजामुळे चालकाला अलर्ट मिळेल आणि तो जागा होईल. त्यामुळे निश्चितच अपघात होण्यापासून रोखले जाणार आहे.
दरम्यान, आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या आयुषचे या त्याच्या संशोधनामुळे त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.