जयंत जाधव
सिंहगडरस्ता – खडकवासला विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. सध्या, या मतदारसंघात भाजपचे आमदार तीन वेळा निवडून आले आहेत. तसेच, हा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदार संघामध्ये येत असल्याने खासदार सुप्रिया सुळे यांचे विशेष लक्ष या मतदारसंघाकडे आहे, त्यामुळ सुळे यांना मानणारा वर्गही या मतदारसंघात आहे. तसेच, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बरोबरचे अनेक जुने-जाणते पदाधिकारी, कार्यकर्तेही या मतदारसंघात आहेत.
परंतु, अजित पवार यांच्या बंडानंतर सध्या या मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती दिसून येते. पक्षातील या दोन्ही मोठ्या नेत्यांच्या भूमिकेमुळे कार्यकर्ते गोंधळून गेले आहेत. नक्की कोणती भूमिका घ्यावी, हेच समजत नसल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगत महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अजित पवार गटासोबत जाणे पसंत केले. सध्या, त्याही खडकवासला मतदारसंघात विविध कार्यक्रमांतून सक्रिय असल्याचे दिसते. त्यामुळे त्या लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध उभे राहतात की विधानसभेसाठी तयारी करतात, असाही प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्ती असलेले भूपेंद्र मोरे यांनी नुकताच अजित पवार गटामध्ये प्रवेश केल्याने नक्की येणाऱ्या निवडणुकीपर्यंत कोण कोण पक्ष सोडून जाईल, याचा अंदाज बांधणेही कठीण असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनाही मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघांमध्ये आहे. त्यामुळे त्यांची पुढील काळातील भूमिका महत्त्वाची ठरेल. सर्व गोंधळाचे वातावरण असले तरी काही कुंपणावरचे नेते मात्र, भाऊ एका गटात आणि स्वतः दुसऱ्या गटात, अशी सावध भूमिका घेताना दिसून येत आहेत.
कंटाळून ‘भाजप’च्या दिशेने
खडकवासला मतदार संघातील राष्ट्रवादीतील गोंधळाच्या स्थितीमुळे कंटाळून काही माजी नगरसेवक सध्या भाजप आणि संघाच्या बऱ्याच कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले आहे. ते ही कोणती भूमिका घेतात याकडेही कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. एकंदरीत नेत्यांचे वरील पातळीवर काही चालले असले तरी राष्ट्रवादीतील तळागाळातील कार्यकर्ते मात्र कोणता झेंडा घेऊ हाती?अशा संभ्रमावस्थेमध्ये असल्याचे दिसून येत आहे.