पिंपरी – पीएमपीच्या खासगी बस ठेकेदारांकडील चालकांनी शुक्रवारी (दि. 25) सकाळच्या सत्रात पीएमपी प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता संप पुकारला. दुसऱ्या दिवशीही त्यावर तोडगा निघाला नाही. या संपामध्ये पीएमपीच्या इलेक्ट्रिक बसवर कार्यरत असलेले ट्रॅव्हल टाइम कंपनीच्या तब्बल 200 बसचालकांचा समावेश आहे. पीएमपीची बससेवा अचानक बंद झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. त्याचा दुसऱ्या दिवशीही परिणाम जाणवला.
महागाईच्या काळात किमान 750 ते 900 रुपयांपर्यंत रोज मिळायला हवा. मात्र, ठेकेदार फक्त 530 रुपयेच देतात. इतक्या कमी पगारात घर कसे चालवणार? त्यामुळे पीएमपी प्रशासनाने यात मध्यस्थी करून योग्य तो निर्णय घ्यावा, यासाठी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. त्यामुळे प्रवासासाठी पीएमपी बसवर अवलंबून असणाऱ्या अनेकांना कार्यालयात, कामावर जाण्यासाठी उशीर झाला. पीएमपी बस गाड्या पुरवणाऱ्या ठेकेदारांच्या चालकांनी अचानक संपावर गेल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याचा फटका प्रवाशांना बसला. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि कर्मचारी हे रोज या पीएमपीने प्रवास करतात. अचानक बसची संख्या कमी झाल्यामुळे अनेकांना कामावर पोहचायला उशीर झाला.
साप्ताहिक सुट्ट्या रद्द
बस चालकांनी अचानक पुकारलेल्या या संपामुळे पीएमपी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील सर्व अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी, वाहक व चालकांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द केल्या आहेत. तर, संप पुकारल्यामुळे बसच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्या. चालकांचे नियोजन करून मार्गावर बस सोडल्या. पीएमपीकडे सध्या 2 हजार 181 बस आहेत. त्यातील काही ठेकेदारांच्या भाडेतत्वावरील तर काही स्व:मालकीच्या आहेत. सुमारे 4 हजार चालकांमार्फत शहरात बससेवा पुरविली जाते. पीएमपीचे स्वत:चे दोन हजार आणि ठेकेदाराचे दोन हजार चालक आहेत. ट्रॅव्हल टाइम कंपनीकडील 200 चालकांनी अचानक संप केला. त्यामुळे पीएमपीच्या वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला. परिणामी, बसेसची वारंवारिता कमी झाली.
एकाच ठेकेदाराच्या बसच्या चालकांनी संपात सहभाग घेतला आहे. सुमारे 150 ते 200 चालक आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी पीएमपी प्रयत्न करत असून पीएमपीकडील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
– सतीश घाटे, कामागर व जनता संपर्क अधिकारी, पीएमपी