मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ‘तुमचा लवकरच दाभोलकर होणार’ अशी धमकी समाजमाध्यमावरून देण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकावणारा भाजपाचा कथित कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच याची कबुलीदेखील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चंद्रशेखर बावनकुळेंचा समाचार घेतला आहे.
दिल्लीत माध्यम प्रतिनिधींशी बोलताना अजित पवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना चांगलेच सुनावले. याविषयी बोलताना, “दाभोलकरांची हत्या झाल्याचं उभा भारतास आणि महाराष्ट्राला माहिती आहे. जर एखादा व्यक्ती म्हणत असेल ‘आम्ही तुमचा दाभोलकर करू’ म्हणजे काय करणार… दाभोलकर डॉक्टर होते म्हणून डॉक्टर करणार का? शरद पवार यांच्याकडेही डॉक्टरेटची पदवी आहे. त्यामुळे बावनकुळेंनी मान्य केलं पाहिजे, आपल्या माणसाचं चुकलं आहे. हे होता कामा नये. महाराष्ट्राची संस्कृती सर्वांना सांभाळली पाहिजे.” असे म्हटले.
त्यासोबतच “भाजपाचे कार्यकर्ते बोलले, तर अन्यही पक्षातील कार्यकर्ते बोलतील. याने विकासाचे प्रश्न बाजूला राहतील. तसेच, ‘तुमचा दाभोलकर करू’ म्हटल्यावर ती धमकी नाही, असं म्हणणं तुमच्या स्वत:च्या सद्विवेकबुद्धीला पटतं का?,” असा थेट सवाल अजित पवार यांनी बावनकुळेंना विचारला आहे.
दरम्यान, कल्याण लोकसभा मतदार संघात भाजपा कार्यकर्ते सांगतील, तोच उमेदवार मान्य केला जाईल. अन्य कोणी उमेदवार सहन केला जाणार नाही, अशी भूमिका भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्याबद्दल विचारल्यावर अजित पवारांनी सांगितलं, “तो युतीअंतर्गत प्रश्न आहे. भांड्याला भांड लागतं. त्यामुळे युतीअंतर्गत बसून मार्ग काढतील.” असेही त्यांनी म्हटले.