ओव्हल – ट्रेव्हस हेडचे शतक व स्टीव्ह स्मिथच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारताविरुद्ध पहिल्या दिवसअखेर आपल्या पहिल्या डावात 3 गडी गमावून 327 अशी भक्कम मजल मारली होती. 3 बाद 76 धावांवरून या जोडीने चौथ्या गड्यासाठी अडीचशे धावांची अखंडित भागीदारी केली व संघाचा डाव सावरताना भक्कम स्थिती प्राप्त करून दिली.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला हा निर्णय महंमद सिराजने सार्थ ठरवला. त्याने संघाची धावसंख्या अवघी 2 असताना सलामीवीर उस्मान ख्वाजाला बाद करक भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर मात्र, सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने मार्नस लेबुशेनसह डाव सवरताना अर्धशतकी भागीदारी केली. ही जोडी डोकेदुखी ठरणार असेच चित्र निर्माण झाले होते. वॉर्नरने भारतीय गोलंदाजीचा समर्थपणे सामना केला. त्याने लेबुशेनलाही आत्मविश्वास दिला. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 69 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. वॉर्नर अर्धशतकाकडे कूच करत असतानाच शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर बाद झाला. त्याचा झेल यष्टीरक्षक श्रीकर भरतने सुरेख टिपला. वॉर्नरने 43 धावांची खेळी करताना 60 चेंडूंचा सामना करताना 8 चौकार फटकावले. उपहाराला खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 23 षटकांत 2 बाद 73 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर सामन्याच्या पहिल्या दिवसाचे दुसरे सत्र सुरू झाले व महंमद शमीने स्थिरावलेल्या लेबुशेनला तंबूचा रस्ता दाखवला. त्याने 62 चेंडूत सावध फलंदाजी करताना 3 चौकारांच्या मदतीने 26 धावांची खेळी केली. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या 3 बाद 73 धावा झाल्या होत्या. मात्र, ट्रेव्हस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी किल्ला लढवला व चहापानापर्यंत सावध फलंदाजी करत संघाचे आणखी नुकसान होऊ दिले नाही. या जोडीने संघाचे शतक फलकावर लावले. पाठोपाठ दीडशतकही फलकावर लावले.
चहापानाला खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 3 गडी गमावून 170 अशी समाधानकारक मजल मारली होती. चहा पानानंतरच्या खेळात या जोडीने शतकी भागीदारी पूर्ण केली. भारतीय गोलंदाज ही जोडी फोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते. मात्र, त्यांना यश येत नव्हते.
हेड शतकाकडे कूच करत असताना स्मिथने आपले अर्धशतक पूर्ण केले. या जोडीने संघाचे द्विशतक फलकावर लावताना दीडशतकी भागीदारीही केली. हेडने शतकाच्या जवळ आल्यावर थोडे चेंडू वाया घालवले व चाचपडतही होता. मात्र, अखेर त्याने आपले शतक थाटात साकार केले. हेडचे हे सहावे कसोटी शतक तर परदेशी भूमीवरचे पहिलेच शतक ठरले. या जोडीने वर्चस्व राखताना संघाच्या अडीचशे धावाही फलकावर लावल्या. त्याचबरोबर चौथ्या गड्यासाठी द्विशतकी भागीदारीही केली. या जोडीने भारतीय गोलंदाजीवर साफ वर्चस्व राखताना संघाचे त्रिशतकही साकार केले. त्यांनी विक्रमी अडीचशे धावांची अखंडित भागीदारीही केली. पंचांनी पाच षटके खेळ आधीच थांबवला तेव्हा ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात 3 बाद 327 अशी भक्कम धावसंख्या उभारली. हेड 156 चेंडूत 22 चौकार व 1 षटकारासह 146 धावांवर खेळत आहे तर स्मिथ शतकाच्या उंबरठ्यावर आहे. त्याने आपल्या नाबाद 95 धावांच्या खेळीत तब्बल 227 चेंडूंचा सामना करताना 14 चौकार फटकावले. भारताकडून महंमद सिराज, महंमद शमी व शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
…म्हणून लावली काळी फीत
भारतात ओडिशात झालेल्या रेल्वे अपघातात अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी भारत व ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी काळी फित लावून खेळ केला. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू, सपोर्ट स्टाफ, आयसीसीचे पदाधिकारी तसेच उपस्थित प्रेक्षक यांनी एक मिनीट शांतता पाळून ओडिशा अपघातातील मृतात्म्यांना आदरांजली वाहिली.
भरतच्या समावेशावर नवल
भारताने यष्टीरक्षक म्हणून श्रीकर भरतला अंतिम संघात स्थान दिले. कर्णधार रोहित शर्माच्या या निर्णयावर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी आश्चर्य व्यक्त केले आहे. माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग यांनी संघ निवडताना हीच मोठी चूक झाल्याचे म्हटले आहे. यंदाच्या मोसमात भरतला एकाही सामन्यात खेळण्याचा सराव नाही. तसेच यंदाच्या आयपीएल स्पर्धेत त्याला गुजरात टायटन्सने एकाही सामन्यात खेळण्याची संधी दिली नव्हती. अशा स्थितीत एव्हलवर होत असलेल्या इतक्या मोठ्या सामन्यासाठी भरात असलेल्या ईशान किशनला बाजूला ठेवत भरतला कशी संधी दिली गेली, असा सवालही या क्रिकेटपटूंनी केला आहे.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 85 षटकांत 3 बाद 327 धावा. (डेव्हिड वॉर्नर 43, मार्नस लेबुशेन 26, ट्रेव्हस हेड खेळत आहे 146, स्टीव्ह स्मिथ खेळत आहे 95, महंमद सिराज 1-67, महंमद शमी 1-77, शार्दुल ठाकूर 1-75).
लक्षवेधी
हेडचे जिद्दी शतक
स्मिथची अर्धशतकी खेळी
वॉर्नरचे अर्धशतक हुकले
अजिंक्य रहाणेचे संघात पुनरागमन
तेल आंदोलकांच्या भीतीने आयसीसीने केल्या दोन खेळपट्ट्या
रवीचंद्रन अश्विनला वगळले
शार्दुल ठाकूरला संधी
रोहितसह गिल करणार डावाची सुरुवात
यष्टीरक्षक म्हणून के.एस. भरतलाच पसंती
ईशान किशन व अक्सर पटेलचा विचार नाही