IPL 2024 : “क्रिकेटर्सच्या आयुष्यात खूपच ढवळाढवळ….”, खाजगी व्हिडिओ चालवल्याबद्दल रोहित शर्माने ब्रॉडकास्टर्सबद्दल व्यक्त केला संताप…

Rohit Sharma Slams IPL TV Broadcaster – भारतीय संघाचा कर्णधार आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचा भाग असलेल्या रोहित शर्माने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये ब्रॉडकास्टर्स विरुद्ध आपला संताप व्यक्त केला आहे. आयपीएलच्या 17 व्या मोसमातील मुंबईचा प्रवास लीग टप्प्यातील सामन्यांनी संपला. आता सर्वांचे लक्ष आगामी टी-२० विश्वकरंडकाकडे लागले आहे, त्यामुळे आयपीएलपासून मुक्त झालेल्या भारतीय खेळाडूंनी आता या मेगा टूर्नामेंटची तयारी सुरू केली आहे. मात्र, त्याच्या या पोस्टने सर्वांना नक्कीच धक्का बसला आहे.
रोहित पोस्टमध्ये आयपीएलमधील टीव्ही ब्रॉडकास्टरचे अधिकार मिळविलेल्या कंपनीवर टीका करताना म्हणाला की, खेळाडूंचेही वैयक्तिक आयुष्य असते आणि ते त्यांच्या मित्र आणि कुटुंबासोबत बाहेर जातात. ते जे काही बोलतात ते रेकॉर्ड करून वाजवणे अजिबात योग्य नाही. क्रिकेटर्सच्या आयुष्यात खूप ढवळाढवळ झाली आहे. कॅमेरे आमचे प्रत्येक क्षण आणि संभाषण सतत रेकॉर्ड करत असतात, मग ते आमच्या मित्रांसह, सहकाऱ्यांसोबत खाजगीत असो किंवा प्रशिक्षण आणि सामन्याच्या दिवसांमध्ये.
माझ्या एका व्हिडिओमध्ये, मी ब्रॉडकास्टरला माझे संभाषण रेकॉर्ड करू नका असे सांगितले होते, परंतु तरीही त्यांनी ते प्रसारित केले, जे गोपनीयतेचे पूर्णपणे उल्लंघन आहे. यासर्व प्रकारामुळे एक दिवस चाहत्यांचा क्रिकेटपटू आणि क्रिकेटमधील विश्वास कमी होईल, अशी भितीही रोहितने व्यक्त केली आहे.
The lives of cricketers have become so intrusive that cameras are now recording every step and conversation we are having in privacy with our friends and colleagues, at training or on match days.
Despite asking Star Sports to not record my conversation, it was and was also then…
— Rohit Sharma (@ImRo45) May 19, 2024
धवल कुलकर्णीसोबतच्या संवादाचा व्हिडीओ
रोहितने त्याच्या पोस्टमध्ये उल्लेख केलेला व्हिडिओ हा धवल कुलकर्णीसोबतच्या त्याच्या संभाषणाचा आहे. ज्यामध्ये त्याने कॅमेरामनला व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास मनाई केली होती, पण तरीही ब्रॉडकास्टरने तो व्हिडिओ प्ले केला होता. या व्हिडिओमध्ये रोहित स्पष्टपणे ऑडिओ बंद करण्याबाबत बोलत होता. कुलकर्णी व्यतिरिक्त केकेआर संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर हे देखील त्यावेळी रोहितसोबत होते. असो असे असले तरी यंदाचा आयपीएल हंगाम रोहितसाठी जास्त चांगला नव्हता. कारण, तो 7 डावांत 20 पेक्षा जास्त धावा देखील करू शकलेला नाही.





