नागपूर -महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र इंटरनॅशनल चेस फेस्टिव्हलमध्ये चॅलेंज लढतीत विदित गुजराथी आणि रौनक साधवानी या युवा भारतीय खेळाडूंनी अनुक्रमे पीटर स्विडलर आणि नायजेल शॉर्ट या अनुभवी खेळाडूंवर निर्णायक विजय मिळवित वर्चस्व गाजविले.
या स्पर्धेत केवळ 18 वर्षे वयाच्या विदितने याआधीच 2700 एलो गुणांकनाच्या एलिट क्लबमध्ये स्थान मिळविले आहे, तब्बल पाच वेळचा रशियन विजेता आणि तीन वेळा कैंडिडेट स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या ग्रॅंडमास्टर पीटर स्विडलरला 17.5 विरुद्ध 10.5 गुणांनी पराभूत करताना विदितने आपण जागतिक स्तरावर उतरण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले.
दुसऱ्या चॅलेंज लढतीत रौनक साधवानीने नायजेल शॉर्टचा 20-8 असा एकतर्फी पराभव केला. विशेष म्हणजे रौनकने तीन वर्षांपूर्वी नायजेल शॉर्टच्या प्रशिक्षण शिबिरात भाग घेतला होता. रौनकने कालच या लढतीत निर्णायक आघाडी घेतली होती. आज त्याने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
विदित व रौनक यांनी एकतर्फी विजयाची नोंद केली. रौनकने ब्लिट्झ लढतींमध्ये आपले कौशल्य दाखवून देताना शॉर्टविरुद्ध 4 पैकी 3.5 गुणांची कमाई केली. विदितला मात्र ब्लिट्झ लढतींमध्ये झुंज द्यावी लागली. त्याने 4 पैकी 2.5 गुणांची कमाई केली. विदितने क्लासिकल आणि रॅपिड लढतींमध्ये तुलनेने सरस कामगिरी केली. मात्र, ब्लिट्झ लढतींमध्ये त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.
भारताच्या रोहित कृष्णा एस याने जॉर्जियाच्या व तिसऱ्या मानांकित लुका पैचाजचा पराभव करून सनसनाटी विजयासह आघाडी प्राप्त केली. वेदांत पानेसर व सेपर मिलोझ यांच्यातील लढत बरोबरीत सुटली व या दोघांनी प्रत्येकी 6.5 गुण मिळवले. वेदांतने 19 चालींमध्ये सेपर मिलोझला बरोबरीत रोखले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ. परिणय फुके, फिडे चेस इन एज्युकेशन कमिशनचे प्रमुख जेरी नाश, एआयसीएफ चेस इन स्कूल्स कमिशनचे अध्यक्ष एके वर्मा आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष अभिजीत कुंटे यांच्या हस्ते करण्यात आले.