T20 World Cup 2024 : हार्दिक पांड्याचा बळजबरीने टीम इंडियात करण्यात आला समावेश? रोहित-आगरकर होते विरोधात…

T20 World Cup 2024 (Team India & Hardik Pandya) :- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) T20 विश्वचषक 2024 साठी 30 एप्रिल रोजी, चार राखीव खेळाडूंसह 15 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा केली होती. या स्पर्धेसाठी रोहित शर्माला कर्णधार आणि हार्दिक पांड्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. पण आता विश्वचषक संघाबाबत एक मोठा खुलासा झाला आहे, ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर हार्दिक पांड्याला संघात घेण्याच्या बाजूने नव्हते. असे सांगण्यात आले आहे.
‘दैनिक जागरण’च्या वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने असा दावा करण्यात आला आहे की, रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांना हार्दिक पांड्याला T20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघात समाविष्ट करायचे नव्हते. दबावाखाली हार्दिकची टी-20 विश्वचषकासाठी निवड झाल्याचे पुढे सांगण्यात आले आहे. याशिवाय टी-20 विश्वचषकानंतर रोहित शर्मा या फॉरमॅटला अलविदा म्हणू शकतो, असेही समोर आले आहे.
रोहित आणि हार्दिक आयपीएलमध्ये ठरत आहेत सतत अपयशी…
दरम्यान, रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या आयपीएल 2024 मध्ये सतत अपयशी ठरत आहेत. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत केवळ एकच शतक झळकावले आहे. त्याशिवाय तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. रोहितने 13 सामन्यात 29.08 च्या सरासरीने आणि 145.42 च्या स्ट्राईक रेटने 349 धावा केल्या आहेत. या काळात त्याने केवळ एक शतक झळकावले आहे, तर हिटमॅनच्या बॅटमधून एकही अर्धशतक आलेले नाही. रोहितने गेल्या 6 डावात 20 धावांचा टप्पाही ओलांडलेला नाही.
हार्दिक पांड्याबद्दल बोलायचे झाले तर, हार्दिकने 13 सामन्यात 18.18 च्या सरासरीने आणि 144.93 च्या स्ट्राईक रेटने 200 धावा केल्या आहेत. त्याच्या बॅटमधून एकही शतक किंवा अर्धशतक आलेले नाही. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 46 धावा आहे. याशिवाय गोलंदाजी करताना हार्दिकने 13 सामन्यात 11 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी 31 धावांत 3 बळी अशी आहे.





