नागपूर – पुरोगामी महाराष्ट्रातील नेते मंडळींचा तोल हल्ली ढासळू लागला आहे. अनेक नेते एकमेकांवर शेरेबाजी करताना अश्लाघ्य भाषेचा वापर करताना दिसतात. भाजप नेते आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला.
भाजपमध्ये ओबीसींचा सन्मान होत नाही, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे. या आरोपाला प्रत्युत्तर देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ओबीसी नेते आहेत. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात ओबीसी आहेत का?
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री ओबीसी आहेत का? छगन भुजबळ स्वतःला ओबीसी नेते म्हणवतात, पण कुठे आहेत ते? सरकारमध्ये असताना अन्न आणि नागरी पुरवठा विभाग घेऊन बसले होते. त्यांना तिथे महत्त्व नाही.
हे लोक आम्हाला शिकवतायत ओबीसींबद्दल, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीच्या आधारावर पत्ते खेळत नाहीत. ओबीसींचे राजकारण करत नाहीत. ओबीसींना भाजपात स्थान नाही असे म्हणणाऱ्या या खोटारड्या लोकांपासून जनतेने लांब राहावे. खोट्या विचारांपासून ओबीसी बंधू आणि भगिनींनी लांब राहावे. खरंतर ओबीसी पंतप्रधान झाल्यामुळे यांच्या (कॉंग्रेस-राष्ट्रवादी) पोटात दुखत असल्याचा टोलाही त्यांनी लगाविला.