सातारा – आशिया खंडातील सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांची वर्णी लागली आहे. पुणे येथील निसर्ग हॉलमध्ये रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या. व्हाईस चेअरमनपदी भगीरथ शिंदे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. या निवडीत तीन वर्षासाठी असल्याचे सांगण्यात आले.
रयत शिक्षण संस्था कालानुरूप बदलत असून पारंपारिक शिक्षण संस्थेपासून ते स्वायत्त विद्यापीठ होण्यापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संस्थेने मोठी भरारी घेतली आहे. नऊ मे रोजी कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी संस्थेच्या
प्रशासकीय कारभारात व्यापकता, पारदर्शकता आणि नवीन आव्हाने पेलण्यासाठीची सज्जता यानुसार काही बदल करणार असल्याचे सुतोवाच केले होते. त्यामुळे त्या दिवशी चेअरमनपदाची निवड न करता ती पुढील पंधरवड्यात करण्याचेही जाहीर केले होते. त्यानुसार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारणी सदस्यांची बैठक पुणे येथे झाली. या बैठकीमध्ये महत्त्वाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
राज्याच्या महसूल प्रशासनात झिरो पेंडेन्सी, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानासारख्या विविध योजनांद्वारे आपल्या प्रशासकीय कामाचा ठसा उमटवलेल्या चंद्रकांत दळवी यांना रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. चंद्रकांत दळवी हे 2018 मध्ये प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या कारभारात सहभागी झाले होते.
ते शरद पवार यांचे जवळचे विश्वासू सहकारी समजले जातात. रयत शिक्षण संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी भगीरथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. उच्च माध्यमिक विभागाच्या सचिवपदी ज्ञानदेव मस्के तर माध्यमिक विभागाच्या सहसचिवपदी मुख्याध्यापक बी. एन. पवार यांची वर्णी लागली आहे. माध्यमिक विभागाचे सहसचिव शिवलिंग मेनकुदळे यांना पुन्हा ऑडिटरपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या निवडी पुढील तीन वर्षासाठी असल्याचे कार्यकारणीच्या सदस्यांनी सांगितले. संस्थेचे माजी चेअरमन अनिल पाटील यांच्याकडे कोणती जबाबदारी राहणार याविषयी चर्चा सुरू असून लवकरच त्यांना महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली जाईल, असे संस्थेच्या सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.