मॉस्को : रशियाने आपली अण्वस्त्रे बेलारुसमध्ये ठेवण्यासाठी बेलारुसबरोबर एक करार केला आहे. रशियातील वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. रशियाचे संरक्षण मंत्री सर्जी शोयगू आणि बेलारुसचे संरक्षण मंत्री विक्टर खेरेनिन यांनी काल या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
या करारानुसार रशियाची अण्वस्त्रे बेलारुसमध्ये एका विशेष सुविधा केंद्रात सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत.
बेलारुसच्या संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे. रशिया आणि बेलारुसने सर्व आंतरराष्ट्रीय कायद्यांना अनुसरुन हा करार केला आहे, असे रशियाचे संरक्षण मंत्री सर्जी शोयगू यांनी म्हटले आहे.
दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांनी सध्याच्या राजकीय आणि लष्करी स्थितीबाबत चर्चा केली. दोन्ही देशांच्या लष्करी तांत्रिक सहकार्याबाबत देखील चर्चा केली होती. बेलारुसने केलेल्या विनंतीनुसार ही अण्वस्त्रे बेलारुसमध्ये ठेवली जाणार आहेत, असे रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी कालच जाहीर केले होते.
बेलारुसचे अध्यक्ष अलेक्झांडर ल्युकाशेंको यांनी रशियाकडे तसा आग्रह बऱ्याच दिवसांपासून धरला होता. यामध्ये काहीही गैर नाही. अमेरिकेने अनेक दशकांपासून आपली अण्वस्त्रे “नाटो’ सदस्य आणि युरोपातल्या अन्य देशात ठेवली आहेत, असे पुतीन म्हणाले.
जर्मनी, तुर्कीये, नेदरलॅन्ड, बेल्जियम, इटली आणि ग्रीस या देशांमध्ये अण्वस्त्रे नाहीत. पण तेथे अण्वस्त्रांच्या साठवणुकीची व्यवस्था आहे. बेलारुसमध्ये रशियाची अण्वस्त्रे ठेवण्याची प्रक्रिया 1 जूनपूर्वी पूर्ण होणार, असल्याचेही पुतीन म्हणाले.