नागपूर – काही दिवसांपूर्वी तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातील ड्रेसकोडच्या फलकावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. तोकडे, असभ्य कपडे परिधान करणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याचा नियम करण्यात आला होता. मात्र यावरून वाद निर्माण झाल्यानंतर मंदिर संस्थांनाच्यावतीने हा निर्णय मागे घेण्यात आला. मात्र आता नागपुरमधील चार मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू (वस्त्र संहिता) करण्यात आले आहे, महाराष्ट्र मंदिर महासंघाने ही घोषणा केली आहे.
महाराष्ट्र मंदिर महासंघाची नागपुरात पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत सुनील घनवट यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मंदिरात अशोभनीय, तोकडे कपडे घालून आल्यास त्या व्यक्तीला परत पाठवण्याऐवजी मंदिराच्या प्रवेशद्वारावर शॉल, ओढणी, धोतर असे कपडे दिले जातील भाविकाला ते वापरून पांघरून मंदिरात जाता येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. केवळ महिलाच नाही तर पुरुषांसाठी देखील हे नियम असणार आहेत.
मंदिरात अंगप्रदर्शन होणार नाही, असभ्य, अशोभनीय व तोकडे कपडे घालून प्रवेश करू नये आणि मंदिराचे पावित्र्य जपले गेले पाहिजे, यासाठी नियम लागू करण्यात आला आहे. सध्या नागपुरातील चार मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आली आहे. पहिल्या महिन्यात नागपुरातील 25 तर राज्यभरातील 300 मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्याचे प्रयत्न आहेत.
सरकारी कार्यालयांसाठी देखील ड्रेस कोड लागू आहे. मग मंदिरासाठी देखील असायला हवे, असे यावेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने सांगण्यात आले. सध्या नागपूरमधील संकटमोचन पंचमुख हनुमान मंदिर, बेलोरी, ब्रहस्पती मंदिर, गोपाळ कृष्ण मंदिर, धनतोली, कोन्होलीबारा, दुर्गामाता मंदिर, हिलटॉप या मंदिर ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे.