सातारा -दोन हजारांच्या नोटा बंद होणार असल्याने अनेकांना टेन्शन आले. मात्र, सातारा पालिकेने केलेल्या आवाहनामुळे अनेकांना दिलासा मिळाला. या आवाहनाला सातारकरांनी जोरदार प्रतिसाद दिला. त्यामुळे पालिकेच्या वसुलीमध्ये शुक्रवारी फक्त एकाच तासात दोन हजारांच्या तब्बल 100 नोटा म्हणजे दोन लाख रुपये जमा झाले. पालिकेच्या तिजोरीत दोन हजारांच्या नोटांचा भरणा वाढला असून थकित घरपट्टी वसुलीला वेग आला आहे.
केंद्र शासनाने दोन हजारांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला असून 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा बदलून घेण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, बॅंकांमध्ये दोन हजारांच्या केवळ दहाच नोटा स्वीकारणे बंधनकारक करण्यात आले आहे. याउलट सातारा पालिकेने घरपट्टी वसूल करण्यासाठी दोन हजारांच्या नोटा स्वीकारल्या जातील, असे आवाहन केले होते. ज्या नोटा बॅंकेत जादा संख्येने बदलून देता येत नाहीत, त्याकरता सातारा पालिका घरपट्टीच्या निमित्ताने स्वीकारत असल्यामुळे सातारा पालिकेच्या सुविधा केंद्रामध्ये घरपट्टी भरण्याकरता करदात्यांची रांग लागली आहे.
शुक्रवारी एका तासामध्ये अनेकांकडून जमा झआलेल्या घरपट्टीच्या रकमेत दोन हजाराच्या चक्क 100 नोटा जमा झाल्या. एका तासांमध्ये पालिकेमध्ये दोन लाख रुपये जमा झाले. पालिकेच्या सुविधा केंद्रात दररोजचा महसूल साडेतीन ते चार लाख रुपयांचा असतो. मात्र, दोन हजारांच्या नोटा स्वीकारल्या जातील या गोष्टीमुळे या महसुलामध्ये 20 टक्क्याने वाढ झाली आहे, अशी माहिती सुविधा केंद्राच्या माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. ज्या नोटा बॅंकेत कमी संख्येने स्वीकारल्या जातात, तसे कोणतेही बंधन सातारा पालिकेत नसल्यामुळे सुविधा केंद्रावर सातारकरांनी दोन हजारांच्या नोटा घेऊन घरपट्टी भरण्यामध्ये स्वारस्य दाखवले आहे.