नवी दिल्ली – अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी बाजार नियामक सेबीने सहा महिन्यांची मुदतवाढ मागितली आहे. त्यावरून अदानी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा सवाल कॉंग्रेसने केला आहे.
शेअर बाजारातील अदानी समुहाशी संबंधित व्यवहारांमध्ये अनियमितता असल्याचा आरोप करण्यात आला. त्या प्रकरणी चौकशी करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सेबीला 2 मार्चला दिला. चौकशीसाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली. आता ती मुदत वाढवून मिळावी अशी विनंती सेबीने न्यायालयाला केली आहे.
त्यावरून कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने सेबीला चौकशीचा आदेश दिला. मुळात त्या समितीचे कार्यक्षेत्र मर्यादित आहे. व्यापक चौकशी संयुक्त संसदीय समितीच (जेपीसी) करू शकते, असे त्यांनी म्हटले.