विडणी – विडणी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राजे गटाने दणदणीत विजय मिळवून पुन्हा एकदा सोसायटीवर आपली सत्ता अबाधित ठेवली आहे.
फलटण तालुक्यात सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असणाऱ्या विडणी विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत उत्तरेश्वर पॅनेलने 13 पैकी 13 जागा जिंकून पुन्हा एकदा सोसायटीवर राजे गटाचीच एकहाती सत्ता मिळवली असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील सर्व विजयी उमेदवार, पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली. तसेच गावातून सर्व विजयी उमेदवारांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.
या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत उत्तरेश्वर पॅनेल व भाजप पुरस्कृत विडणी विकास आघाडी यांच्यामध्ये दुरंगी लढत झाली. ही निवडणूक दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रतिष्ठेची बनली होती त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारसभेत संजीवराजे नाईक निंबाळकर, विश्वजितराजे नाईक निंबाळकर,डॉ. बाळासाहेब शेंडे, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, सरपंच सागर अभंग इत्यादींनी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या होत्या. म्हणून या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदानासाठी मोठी गर्दी केली होती. याठिकाणी मोठा पोलिस फाटाही तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता निवडणूक शांततेत पार पडली. सर्व विजयी उमेदवारांचे रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले.